एमआयटी डब्ल्यूपीयूत शिक्षक दिन उत्साहात साजरा.
पुणे, ०५ सप्टेंबर २०२४ : “सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण महत्वपूर्ण आहे. त्यामुळे शिक्षक हा सामाजिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू मानला जातो. ज्ञान सर्वश्रेष्ठ असून लोककल्याणासाठी ज्ञानदान हा शिक्षकांचा परमधर्म आहे. शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचा सर्वतोपरी उपयोग करून विद्यार्थ्यांना परिपूर्ण घडवावे.” असे प्रतिपादन एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक – अध्यक्ष, विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केले. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त एमआयटीडब्ल्यूपीयू, कोथरूड येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. संजय उपाध्ये, ॲड. संतोष पवार, डॉ. दत्ता दंडगे, डॉ. प्रियंकर उपाध्याय, डॉ. मृदुला कुलकर्णी, डॉ. पी. जी. धनवे, कुलसचिव गणेश पोकळे, विष्णू भिसे, डॉ. टी. एन. मोरे आदी उपस्थित होते.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ” विद्यार्थ्यांना ज्ञान, विज्ञान, कला, कौशल्याबरोबरच आध्यात्मिक संत संस्काराचे शिक्षण द्यावे. महाभारतातील श्रीकृष्णासारख्या शिक्षकांची आज समाजाला गरज आहे. प्रत्येक विद्यार्थी देशाचा एक चांगला नागरिक घडवण्यासाठी शिक्षकांनी सदैव प्रयत्नशील असावे.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, ” ज्ञान, विज्ञानाबरोबर जगण्याचा आयोग हा केवळ गुरूंमुळे शक्य होतो. जीवनाच्या मूल्य मार्गदर्शनासाठी प्रत्येकाला एक गुरू हवाच असतो. आज शिक्षण कंज्यूमर होऊ नये यासाठी शिक्षकांनी जाणीव ठेवावी.”
ॲड. संतोष पवार म्हणाले, ” शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांनी कृतज्ञता आणि शरणागती बाळगावी. जीवनाला पूर्ण आकार देणारा शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांनी परिवर्तन करणाऱ्या शिक्षकांच्या सानिध्यात राहावे. “
यावेळी विष्णू भिसे, डॉ. शालिनी टोणपे, डॉ. मृदुला कुलकर्णी, डॉ. दत्ता दंडगे, डॉ. प्रियंकर उपाध्याय यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याला उजाळा देत आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मिलिंद पात्रे यांनी केले. गणेश पोकळे यांनी आभार मानले.