पुणे, दि. ५ : जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शासकीय संस्था तंबाखू मुक्त करण्यासाठी कोटपा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हा शल्यचिकित्सक तथा जिल्हा तंबाखू नियंत्रण समीतीचे सदस्य सचिव डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, नोडल अधिकारी डॉ. राहुल पिंपळकर, जिल्हा सल्लागार डॉ. जयश्री सारस्वत, मानसशास्त्रज्ञ श्री. हनुमान हाडे, सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी भोसले समिती सदस्य उपस्थित होते.
डॉ. यमपल्ले म्हणाले, तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेवून विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात यावेत. जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या तबांखूमुक्त शैक्षणिक संस्था उपक्रमाला गती द्यावी. येणाऱ्या गणेशोत्सवात तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत पुणे शहरातील मुख्य ठिकाणी फलक लावून जनजागृती करावी.
कोटपा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती प्रमाणे तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय व सनियंत्रण समिती स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. आंबेगाव, इंदापूर आणि शिरूर या तालुक्यात अद्यापही समिती स्थापन करण्यात आली नाही. या ठिकाणी तात्काळ समिती स्थापन करावी, असे सांगून जिल्हा रुग्णालय औंध येथे महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी कर्क रोगावरील बाह्य रुग्ण विभाग सूरू असून त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन श्री. यमपल्ले यांनी केले.
डॉ. देसाई म्हणाले कोटपा कायद्यानुसार शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी, तंबाखूची जाहिरात आदी निर्बंध आहेत. त्या अनुषंगाने संबंधित विभागाने तंबाखू विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी. शहरी भागासह ग्रामीण भागात भरारी पथकाच्या माध्यमातून वेळोवेळी दुकानांना भेटी द्याव्यात, असे सांगून तंबाखू विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर संबंधित विभागाने कारवाई करावी असेही त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाचा आढावा घेण्यात आला. डॉ. सारस्वत यांनी ऑगस्ट अखेर तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली.
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षात ऑगस्ट अखेर ३६ प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून ३ हजार ७९३ नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच २२ तंबाखू मुक्ती केंद्रामार्फत ४ हजार ८०६ नागरिकांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याअंतर्गत जिल्हाशल्यचिकित्सक कार्यालयाने १५२ नागरिकांवर कारवाई करुन २७ हजार ७५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस विभागाकडून ५०० नागरिकांवर कारवाई करून न्यायालयीन घटले दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
ऑगस्ट अखेर सुमारे ७ लाख ९१ हजार रुपयांचा गुटखा जप्त
ग्रामीण आणि शहर पोलिसांनी २०२४-२५ मध्ये ऑगस्ट अखेर अन्न व औषध अधिनियमाखाली ४ लाख ३० हजार ७३६ रूपये रकमेचा गुटखा आणि कोटपा कायद्याअंतर्गत ३ लाख ६० हजार २९९ रुपयांचा हुक्का व इतर पदार्थ जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासनाने एका प्रकरणात कारवाई करुन ११ लाख २ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.