श्री माणिक प्रभू सेवा मंडळ पुणे तर्फे होणार स्वागत ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, जंगली महाराज मंदिर आणि श्री सद्गुरू शंकर महाराज मठात करणार आरती
पुणे : कर्नाटक हुमनाबादजवळील श्रीक्षेत्र माणिकनगर येथील चतुर्थ दत्त अवतार श्री माणिकप्रभु संस्थानाचे सहावे आणि विद्यमान पीठाधिपती श्री सद्गुरू ज्ञानराज माणिकप्रभु महाराज दि. ७ आणि ८ सप्टेंबर असे दोन दिवस पुण्यात असणार आहेत. यामध्ये ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती आणि श्री सद्गुरू शंकर महाराज मठात आरती करणार आहेत, अशी माहिती श्री माणिक प्रभु सेवा मंडळ पुणे चे कन्हैया दुबे आणि सुषमा बंन्नीकोड यांनी दिली.
श्री सद्गुरू ज्ञानराज माणिक प्रभु महाराज यांच्या हस्ते शनिवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११:११ वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती गणेशोत्सव २०२४ मध्ये श्रीं ची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. रविवार, दि. ८ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजता श्री सद्गुरु जंगली महाराज मंदिरात महाराजांचा आगमन व दर्शन सोहळा होईल. त्यानंतर सायंकाळी ४:३० वाजता पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची महाआरती महाराजांच्या हस्ते होईल. तसेच, सायंकाळी ७ वाजता श्री सद्गुरू शंकर महाराज मठात प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
सन १९७५-७६ साली सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून राष्ट्रीय स्तरावरचे राष्ट्रपती सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात आलेले श्री ज्ञानराज माणिकप्रभु, उच्च विद्याविभूषित आहेत. अध्यात्म, वेदांत आणि काव्यशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. त्यांनी श्री माणिक प्रभु संस्थानाला आध्यात्मिक वैभवाच्या एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. तरी पुणेकरांनी या अध्यात्मिक महापर्वणीचा आणि श्री ज्ञानराज माणिक प्रभूंच्या विद्वत्ताप्रचुर आणि जीवनाला सुयोग्य दिशा देणाऱ्या आशीर्वाचनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सद्गुरु माणिकप्रभु सेवा मंडळ, पुणे, यांच्यातर्फे करण्यात येत आहे.