पुणे- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. नेमक्या याच पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासाठी आता काँग्रेसचे कार्यकर्ते – पदाधिकारी सरसावले आहेत. ‘ महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री ‘अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी बुधवारी काँग्रेस भवन दणाणून सोडले.विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या आढावा बैठकीसाठी आलेल्या राज्यातील नेत्यांसमोर पटोले हेच भावी ‘सीएम ‘या आग्रही मागणीमुळे काँग्रेसच्या वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम महाराष्ट्र विभाग जिल्हानिहाय बैठकीच्या निमित्ताने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या राज्यातील नेत्यांसमोर ‘ महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री ‘ म्हणून घोषणा देत नाना पटोले यांना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेस भवनमध्ये गर्दी केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आबा बागुल यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती. ‘नानाभाऊ आगे बढो’ अशा घोषणा देताना ‘कामगिरी दमदार,आता आबा बागुल आमदार ‘अशा घोषणा देऊन पर्वती विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या अशी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त स्वागताने भारावलेल्या नाना पटोले यांनीही कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि पर्वती मतदारसंघासाठी पक्षाने मागणी केली आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही पुन्हा दिल्याने कार्यकर्त्यांमधील उत्साह अधिकच संचारला.तर पदाधिकारी -कार्यकर्त्यांच्या ‘ महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री ‘या घोषणांसह कार्यकर्त्यांमधील चैतन्याने नाना पटोले हेही सुखावल्याचे चित्र पाहावयास मिळाले.