गायन वादनातून पं. किशन महाराज यांना आदरांजली
पुणे ता.४: लयबद्ध युगल तबला वादनाने झालेली दमदार सुरुवात, त्यास व्हायोलिनच्या अद्वितीय सुरांनी चढवलेला साज अन् पं. उल्हास कशाळकर यांच्या लयकारी स्वरांनी त्यावर रचलेला कळस अशी विलक्षण अनुभूती एकाच स्वरमंचावर देणाऱ्या ‘श्रद्धा सुमन’ मैफिलीस रसिकांनी भरभरून दाद दिली.
तबलासम्राट पद्मविभूषण पं. किशन महाराज यांच्या १०१ व्या जन्मदिनानिमित्त पं. अरविंदकुमार आजाद यांच्या तालायन म्युझिक सर्कलतर्फे ही मैफल घेण्यात आली. तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर, पं. राजेंद्र कंदलगावकर, रत्नाकर गोखले, सुहास व्यास आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आकाशवाणीची सर्वोच्च श्रेणी प्राप्त झाल्याबद्दल पं. अरविंदकुमार आजाद यांचा देखील यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
पं. अरविंदकुमार आजाद यांचे शिष्य असलेले सौरभ गुळवणी व संदीपन मुखर्जी यांच्या जुगलबंदी तबला वादनाने मैफलीस प्रारंभ झाला. बनारस घराण्याचा खुला बाज सादर करताना तीनतालमध्ये उठा, गत, बंदिश, चक्रदार, परण आदींची बहारदार प्रस्तुती त्यांनी केली. प्रत्येक ध्वनी तरंगांनी कधी रोमांच उभा केला तर, कधी हळूवारपणे रसिकांच्या मनाला साद घातली. बोलांची स्पष्टता, डग्गा-तबल्याचा योग्य समतोल, नेटके सादरीकरण ही त्यांच्या वादनातील वैशिष्ट्ये होती. त्यांना अभिषेक शिनकर (संवादिनी) यांनी उत्तम साथ दिली. सौरभ आणि संदीपन या युवा वादकांच्या जुगलबंदीने रसिकांना ताल धरायला लावला.
त्यानंतर आपले वडील, ज्येष्ठ बंधू तसेच सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक टी. एम. पटनाईक अशा अनेक गुरूंच्या तालमीतून समृद्ध झालेल्या पं.संतोषकुमार नाहर यांच्या व्हायोलिन वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी राग किरवानी सादर केला. गायकी अंग हे त्यांच्या वादनाचे वैशिष्ट्य. आणि त्यांच्या वादनास पं. अरविंदकुमार आजाद (तबला) यांची लाभलेली समर्पक साथ यामुळे ही मैफल अधिकच बहरली.वैविध्यपूर्ण रागांचा एकएक सूर उलगडत नेत त्यांनी व्हायोलिनवर शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताचा अनोखा नजराणा रसिकांसमोर पेश केला.
उत्तरार्धात आपल्या अनोख्या गायन शैलीतून रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केलेल्या पं. उल्हास कशाळकर यांचे गायन आणि साथीला तालयोगी पद्मश्री सुरेश तळवळकर यांचे लयकारी तबलावादन रसिकांनी अनुभवले. सुरुवातीला पं. कशाळकर यांनी राग ‘शुद्ध कल्याण’ ताकदीने सादर केला. एखाद्या रोपाला पालवी फुटावी, ती विस्तारावी आणि नंतर त्याचा डेरेदार वृक्ष व्हावा, असा स्वरांचा सुरेल प्रवास त्यांच्या सादरीकरणात अनुभवताना अधिकच मधूर वाटला. ‘तिलक कामोद’ रागातील ‘सूर संगत’ तसेच ‘मन मे मोहन बिराजे’ या बंदिशीने त्यांनी आपल्या प्रस्तुतीची सुरेल सांगता केली. त्यांना तालयोगी पद्मश्री सुरेश तळवलकर (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), अद्वैत केसकर आणि साईऐश्वर्य महाशब्दे (तानपुरा) यांची समर्पक साथ लाभली.
यावेळी पं.अरविंदकुमार आजाद यांचा चिमुकला शिष्य ओम् कृष्ण याने संस्कृत भाषेतून पं. किशन महाराज यांच्याविषयी व्यक्त केलेले मनोगत रसिकांना भावले. श्रद्धा सुमन मैफिलीस दर्दी रसिकांची उस्फूर्त उपस्थिती लाभली. गायन आणि वादनाचा सुरेल मिलाफ रसिकांनी या मैफिलीतून अनुभवला.