पुणे : ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून तिला जीवे मारण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एकाला फरासखाना पोलिसांनी अटक केली. गजबजलेल्या गणेश पेठेतील डुल्या मारुती चौक परिसरात ही घटना घडली.
याप्रकरणी विक्रम जोगी विश्वकर्मा (वय ३०, मूळ रा. नेपाळ) याला अटक करण्यात आली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला गणेश पेठेत एकट्याच राहतात. त्यांची मुलगी विवाहित असून, ती धनकवडीतील आंबेगाव पठार भागात राहायला आहे.सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास विश्वकर्मा गणेश पेठेतील महिलेच्या घराजवळ आले. पावसामुळे दरवाजा खराब झाल्याने महिलेने दरवाजा उघडा ठेवला होता. कोणी नसल्याचे पाहून विश्वकर्मा घरात शिरला. ज्येष्ठ महिला झोपेत होत्या. विश्वकर्माने महिलेच्या तोंडावर उशी दाबली. महिलेने विरोध करून आरडाओरडा केला. रहिवाशांनी त्वरीत या घटनेची माहिती दिली. गणेश पेठ पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. विश्वकर्माला ताब्यात घेतले.विश्वकर्मा फिरस्ता असून, तो सध्या सदाशिव पेठेत राहायला असल्याची माहिती मिळाली. चोरीच्या उद्देशाने त्याने ज्येष्ठ महिलेला मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे तपास करत आहेत.