पुणे-मी लवकर उठतो ,मी लवकर उठतो , काय उपकार करता , कशाला उठता , कुणी सांगितलं तुम्हाला ?तुम्ही लवकर उठता हा आमचा नव्हे तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, अशा खोचक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले बंधू तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.निरा शिव तक्रार, पुरंदर येथील रस्ता भूमिपूजन कार्यक्रम समयी त्या भाषण करताना त्यांनी हि टीका केली.
अजित पवार आपल्या भाषणांत नेहमीच आपण भल्या पहाटे उठून कामाला लागतो असा दावा करतात. सुप्रिया सुळे यांनी पुरंदर येथील एका सभेत त्यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. तसेच कुणी लवकर उठून कुणावरही उपकार करत नसल्याचेही ठणकावून सांगितले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, तुम्ही रात्रंदिवस काम करत असल्याचे सांगता. तुम्ही लवकर उठा असे आम्ही कधी आग्रह धरला का? सर्वचजण कष्ट करतात. त्यामुळे लवकर उठून कुणी कुणावर उपकार करत नाही. काही लोकांचा सकाळी लवकर उठण्याचा डायलॉग माझ्यामुळे बंद झाला.दूधवालाही लवकर उठतो. तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे. कारण तिला तुम्हाला चहा करून द्यावा लागतो. शरद पवार साहेबांनी आतापर्यंत केव्हातरी असे भाषण केले आहे का? कुणी लवकर उठतो म्हणून दररोज भाषण करत सुटतो का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.सुप्रिया सुळे यांनी यावेळी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांच्यावरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, आमदार दत्ता भरणे हे आपल्या मतदारसंघात 5 हजार कोटींची विकासकामे केल्याचा दावा करतात. हा आकडा म्हणजे काही विनोद नाही. मला स्वतःला एका कोटीत किती शून्य असतात हे माहिती नाही. सत्ता येते आणि जाते. पण तुम्ही लोकांचा विचार केव्हा करणार? कुणी कुणावर उपकार करत नसतो. प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत असतो.