मागील 100 वर्षांत देशात केव्हाच पुतळा पडला नाही…मग राजनाथ सिंहांना संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल
मुंबई-बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण तथा शिवाजी महाराजांच्या कोसळेल्या पुतळ्याच्या मुद्यावरून महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित झाला आहे. यातून निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींनी वेग आल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
…मग राजनाथ सिंहांना संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल-पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम नौदलाकडे होते असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे विधान नौदलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे व मनोधैर्य खच्चीकरण करणारे आहे. या प्रकरणी नौदलाची चूक असेल तर मग ही जबाबदारी केंद्र सरकारला स्वीकारावी लागेल. त्यातून राजनाथ सिंह यांना आपल्या संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल.नौदलाने देशासाठी अभिनव कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित करणे हे तिन्ही सैन्य दलांसाठी अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे राजकीय विधाने करताना आपले तिन्ही सैन्य दल कोणत्या स्थितित काम करतात याचे भान ठेवले पाहिजे.
बदलापूर येथील एका शाळेत 2 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची बाब उजेडात आली होती. त्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. या प्रकरणी सरकारला चौफेर टीका सहन करावी लागली. या घटनेचे वादळ शमते न शमते तोच मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याची घटना घडली. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारची चांगलीच कोंडी झाली. विशेषतः यामुळे सरकारने राबवलेल्या महत्त्वकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाही झाकोळली गेली. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मराठी दैनिकाशी बोलताना वरील दावा केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, बदलापूर व राजकोट पुतळ्याप्रकरणी जनतेत प्रचंड रोष आहे. त्यांच्या भावना संतप्त आहेत. मागील 100 वर्षांत देशात केव्हाच पुतळा पडला नाही. त्यातच या प्रकरणी नौदलाला लक्ष करण्यात आल्यामुळे नौदलातही अस्वस्थता आहे. विशेषतः वेगवेगळ्या सर्व्हेंची आकडेवारीही महायुतीसाठी निराशाजनक आहे. केंद्रीय संस्थांच्या सर्वेक्षणानुसार महाविकास आघाडीला 180 च्या आसपास जागा मिळतील. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून काही काळ जाऊ द्यायचा आणि त्यानंतर वातावरण शांत झाल्यानंतर निवडणुकांना सामोरे जायचे अशा हालचाली सुरू आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप माफी मागितली नसल्याच्या मुद्याकडेही यावेळी लक्ष वेधले. ते म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम कोणत्या एजन्सीकडे दिले होते, त्याचे दस्तावेज सरकारने जाहीर करावेत. पुतळा बनवणारे कुणाच्या जवळचे होते हे ही समोर आले पाहिजे. अशा प्रश्नांवरील चर्चांमुळे वातावरण बिघडले आहे. त्यामुळे या प्रकरणाची माहिती तातडीने जनतेपुढे जाहीर करावी.
पुतळा कोसळण्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली. पण देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप माफी मागितली नाही. दरम्यान, येत्या 1 तारखेला महाविकास आघाडी पुतळा कोसळण्याच्या घटनेविरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.