पुणे: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या रियालिटी शोने प्रचंड लोकप्रियता मिळविली असून, मावळची बालगायिका अवनी आशुतोष परांजपे हिने जुगलबंदी सादर करुन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. गीत बागडेबरोबर ‘उगवला चंद्र पुनवेचा’ हे नाट्यगीत, ‘डोल डोलतेय वाऱ्यावर’ या कोळीगीत गायले. अवनीच्या या जुगलबंदीला परीक्षक सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांनी जागेवर उभे राहून मानवंदना दिली. तसेच तिच्याजवळ जाऊन भरभरून कौतुक केले. ओपी परफॉर्मन्सचा पुष्पवर्षाव झाला. ‘आवाज वाढव’ अशी प्रोत्साहनपर आरोळी मिळाली. सचिन पिळगावकर यांनी त्यांची स्पेशल शंभर रुपयाची नोट देऊन दोघींचे कौतुक केले. घंटा नादही केला. जुगलबंदीतील दोन्ही कलाकार सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत, असा वेगळा निर्णय दिला.
अवनी परांजपे ही कलापिनीच्या वातावरणात घडलेली बालकलाकार अंजली कराडकर यांच्याकडून गायन कीर्तन, नाट्यभिनयाचे शिक्षण घेत आहे. कलापिनीचे बालनाट्य शिबिर, दिवाळी पहाट अशा कार्यक्रमात अवनीचा सहभाग असतो. कलापिनी आयोजित मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा, बालकथा नाट्य स्पर्धा, यात अवनीने प्रथम पारितोषिके मिळवली आहेत. अवनी व अंजली कराडकर यांची बेल्जियम आणि नेदरलँड्स या ठिकाणी कीर्तने झाली आहेत. अवनी कथक नृत्याचेही शिक्षण घेत आहे, भारतीय विद्या भवनच्या सुलोचना नातू विद्या मंदिरात इयत्ता नववीमध्ये ती शिकत आहे. आपले गायन कौशल्य, गुणवत्ता, आणि रसिकांचे पाठबळ आशीर्वाद यामुळे तळेगावचे व मावळचे नाव गाजवेल असा विश्वास वाटतो.