- बँकेच्या रांगेत महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉ.गोऱ्हे यांच्याकडून स्वखर्चातून २ लक्ष रुपयांची घोषणा
- लाडकी बहीण योजना महिला सन्मान मेळाव्याचे अक्कलकुवा येथे आयोजन
अक्कलकुवा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. यानिमित्ताने नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा मधील कालिका माता मंदिर सभागृहात दिनांक २४ ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजना महिला सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.आमदार आमश्या पाडवी व शिवसेनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमात डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. याप्रसंगी डॉ.नीलम गोऱ्हे यांचा शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व देवीची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले.
नंदुरबार मधील रस्ते चांगले व्हावे ही सर्वांची इच्छा असून, पुढच्या सहा महिन्यांच्या आत नंदुरबारचे रस्ते चांगले करू, तसेच आतापर्यंत ७० कोटी रुपयांपर्यंत निधी रस्त्यासाठी दिला असून, येणाऱ्या काळात अजून निधी मिळावा यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी उपस्थित जनतेला सांगितले.
लाडकी बहिण योजनेत जर कोणी मी एजंट किंवा दलाल आहे असे सांगत असेल, तर त्याच्यावर विश्वास ठेऊ नका,असा इशारा यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी दिला.
अक्कलकुवा जिल्हा उपरुग्णालय व्हावे यासाठी मी स्वतः प्रयत्न करत असल्याचे यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.पिंपलखुंटा येथे तालुका रुग्णालय लवकरच होईल अशी ग्वाही यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी दिली.
महिलांना बँकेमध्ये होत असलेल्या त्रासामुळे, त्यांना बँकेच्या रांगेत उभे राहण्यास अडचण होऊ नये, तसेच खूप वेळ बँकेच्या रांगेत उभे राहिल्यामुळे गैरसोय होऊ नये यासाठी महिलांना चहा पानाची व्यवस्था करणार असल्याचे यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.तसेच यासाठी स्वखर्चातून लक्ष रुपयांचा देत असल्याची घोषणा यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी केली.
‘जेव्हा ही योजना घोषित करण्यात आली, त्यानंतर विरोधकांनी या जिल्ह्यात खोटा प्रचार करायला सुरवात केली. ही योजना खोटी आहे.पण तेव्हा मी सर्वांना सांगितले की गरिबांना भेटणाऱ्या १५०० रुपयांची किंमत किती मोठी आहे, तसेच कोणीच या योजनेपासून वंचित राहणार नाही’ असे देखील यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी नमूद केले.
आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले, अनेक योजना आल्या पण महिलांसाठी योजना आणणारे एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ज्यांनी महिलांचा सन्मान केला असे प्रतिपादन यावेळी संगीता चव्हाण यांनी कार्यक्रमात बोलताना केले.
आमदार म्हणून काम करण्याची संधी दिल्याबद्दल आमश्या पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांचे आभार मानले.
यावेळी संगिता चव्हाण (महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य)पर्णिताताई पोंक्षे (नंदुरबार जिल्हा महिला संपर्क प्रमुख), आमश्या दादा पाडवी (विधान परिषद सदस्य),शंकर पाडवी (समाज कल्याण सभापती जि.प. नंदुरबार), जवराबाई पाडवी( सरपंच कोयलीविहीर),उषाताई बोहरा (सरपंच अक्कलकुवा),अंजुताई पाडवी(सरपंच सोरापाडा),तसच सर्व अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षक, लाडकी बहिन योजना लाभार्थी, महिला व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.