महिलेला संपूर्ण गावादेखत मारहाण,तिच्या १४ वर्षाच्या मुलीचा विनयभंग.. दीड वर्ष न्यायासाठी पोलीस आणि महिला आयोगाकडे याचना
पुणे : कोलकाता महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणातून संपूर्ण देश पेटलेला आहे. कोलकाताच नव्हे तर खुद्द राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा राहत असलेल्या पुण्यातही महिला सुरक्षित नाहीत. पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गरीब महिलेला संपूर्ण गावादेखत मारहाण केली जाते, तिच्या १४ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केला जातो, या घटनेला दीड वर्ष उलटले तरी अद्याप पौड पोलीस तक्रार घेत नाहीत आणि धक्कादायक बाब म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या कार्यालयात ५ वेळा जाऊनही त्या भेटत नाहीत. की यावर कोणताही आवाज उठवत नाहीत. अनेक पीडितांना न्याय तर सोडाच मात्र व्यथादेखील ऐकून घेण्यास त्यांना वेळ नसल्याने मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा महिला आयोगाच्या अध्यक्ष पद काम करणाऱ्या महिलेला द्या, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या गौरी वांजळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
पुणे जिल्ह्यात महिलांवर अनन्वित अत्याचार होत आहेत. पण महिला अध्यक्षांना त्या महिलांचा कळवळा तर येणे सोडाच मात्र त्या केवळ महिला आयोग अध्यक्षपद मिरवत आहेत. पौड पोलिसांच्या प्रकरणानंतर दुसरे प्रकरण असे की पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात काशिनाथ येडे हे वरिष्ठ क्लार्क आहेत. ते दौंड वरून रोज जाऊन येऊन करतात. त्यांची बहीण ही मानसिक रुग्ण व अपंग असून त्यांच्यावर तिची जबाबदारी आहे. त्यांना सोईच्या ठिकाणी म्हणजे पुणे ग्रामीण पोलीस दलात बदली करावी याबाबतही अनेकवेळा महिला आयोगाकडे अर्ज केले पण त्यावर काही एक कार्यवाही झालेली नाही. महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराची अनेक प्रकरणे सामाजिक कार्यकर्त्या म्हणून वांजळे हाताळत असल्याचे म्हणाल्यात
एकीकडे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर आपले राजकीय करिअर घडविण्यात व्यस्त आहेत. राजकीय कार्यक्रम, प्रचार, दौरे, टीका करणे, या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्याकडे असलेल्या “घटनात्मक पदाचा” त्यांना विसर पडला आहे. दुसरीकडे मात्र न्यायासाठी पिडीतांच्या कुटुंबाने पोलीस स्टेशन पासून ते न्यायालयाचे उंबरठे झिजवावे, सुनावणी ची पुढची तारीख घेऊन हतबल मनाने घरी यावे लागते. त्यामुळे राज्याला कार्यक्षम महिला आयोग अध्यक्ष मिळण्याची गरज असल्याचे वांजळे यांनी स्पष्ट केले.