नागपूर-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासूनच राज्यात फोडाफोडीचे व जातीयवादाचे राजकारण सुरू झाले. त्यांनीच जातीपातींत विष कालवण्याचे काम सुरू केले, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी केला. ते नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.राज ठाकरे यांनी शनिवारी येथील रवीभवन येथे मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विद्यमान सरकार व महाविकास आघाडीवर विशेषतः शरद पवार यांच्यावर अत्यंत तिखट टीका केली. राज ठाकरे म्हणाले की, राज्यात फोडाफोडीचे राजकारण शरद पवार यांनी सुरू केले. पुलोदच्या स्थापनेपासून हा प्रकार सुरू झाला. त्यांनी गणेश नाईक, नारायण राणे, छगन भुजबळ असे अनेक नेते फोडले. त्यानंतर जातीचे विषही त्यांनीच कालवले. 1999 मध्ये राष्ट्रवादीचा जन्म झाला. त्यावेळचा महाराष्ट्र पाहिला तर राष्ट्रवादीच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रात केव्हाच महापुरुष व संतांची जातीपातींत विभागणी झाली नव्हती. पण 1999 नंतर असे घडण्यास सुरुवात झाली.
राज ठाकरे म्हणाले, मागच्या 5 वर्षांत राज्यात ज्या प्रकारचा राजकीय खेळ झाला, त्याला लोक कंटाळलेत. लोकसभेला 400 पारची घोषणा आणि संविधान बदलण्याच्या घोषणेमुळे मुस्लीम व दलित समाजाने एकगठ्ठा मतदान केले. हे मतदान अँटी मोदी व अँटी शहा असे होते. ते काही उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी मतदान नव्हते. ती वाफ आता निघून गेली आहे. त्यामुळे विधानसभेला गोष्ट वेगळी आहे. कारण 5 वर्षांपूर्वी मतदारांबरोबर जी प्रतारणा झाली, ते लोक विसरलेले नाहीत. या गोष्टीचा राग विधानसभेच्या निवडणुकीला नक्की काढतील. हे मला दौऱ्याच्या माध्यमातून दिसत आहे.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. येथील मतदारांनी मागील 50 वर्षांत असा चिखल केव्हाच पाहिला नव्हता. मतदार ही गोष्ट केव्हाच विसरणार नाहीत. या गोष्टींचा राग ते आगामी विधानसभा निवडणुकीत निश्चितच काढतील, असे ते म्हणाले.
राज ठाकरे यांनी यावेळी बदलापूरच्या घटनेवरूनही सरकार व विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, बदलापूरची घटना आमच्या कार्यकर्त्यांनी समोर आणली. या घटनेनंतर अशा घटनांची अक्षरशः फटाक्यांची माळ लागली. ही माध्यमांसाठी दररोजची एक बातमी असायला हवी होती. गत काही वर्षांत सरकारने महिला सुरक्षेशी संबंधित अनेक योजना आणल्या. कोट्यवधी रुपये खर्च केले. पण त्यानंतरही महिलांशी संबंधित अत्याचाराच्या घटनांत घट झाली नाही. ही सत्ताधारी व विरोधक यांच्यासाठीही शरमेची गोष्ट आहे. या घटनांमुळे देशातील प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेश व बिहारसोबत केली जात आहे.
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र किंवा देशात नवा गृहमंत्री आला तर त्याला कोणतीही माहिती नसते. याऊलट पोलिसांना सर्वकाही माहिती असतात. त्यामुळे सरकारने पुढाकार घेऊन त्यांना मोकळीक दिली तर गुन्हेगारीचे उच्चाटन होईल. सर्वकाही साफ होईल. एवढी ताकद महाराष्ट्र पोलिसांमध्ये आहे. पण दुर्दैवाने आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारने त्यांना अशी मोकळीक दिली नाही.
ठाकरेंसह शिंदे, फडणवीसांविरोधात उमेदवार देणार-पत्रकारांनी राज ठाकरे यांना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देणार का? असा प्रश्न केला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, वरळी विधानसभेत आमची 37 ते 38 हजार मते आहेत. मागच्यावेळी आम्ही निवडणूक लढवली नाही. पण यावेळी आम्ही तिथे उमेदवार देणार आहोत. महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी मनसे आपले उमेदवार देईल. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही विरोधात उमेदवार दिले जातील.सध्या महाराष्ट्रातील किती जागा लढवायच्या याविषयी पक्षीय पातळीवर सर्व्हे सुरू आहे. 2009 मध्ये साली आम्ही 225 जागांवर निवडणूक लढविली होती. यावेळीही किमान तेवढ्याच जागांवर उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
१) दिवाळीच्या नंतर विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागतील असं वाटतंय. अर्थात आचारसंहिता लागली की निवडणुका लागल्या असं म्हणता येईल. या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी मी इथे आलो आहे. २) महाराष्ट्राची आत्ताची जशी परिस्थिती आहे तशी कधी पाहिली नाही. महायुती असो की महाविकास आघाडीत तिकीट वाटपाच्या वेळेस खूप गोंधळ असणार आहे आणि तिकडे प्रत्येकजण इच्छुक आहे. आणि त्यांच्या आपापसातील माऱ्यामाऱ्या खूप होणार आहेत. पण माझ्या पक्षाबद्दल बोलायचं आहे तर आमच्यासाठी वातावरण सकारात्मक आहे. ३) लोकसभेला महाविकास आघाडीला जे मतदान झालं, त्यात मोदी आणि शाह यांच्या विरोधात एकगठ्ठा मतदान होतं. त्यात भाजपच्या काही उमेदवारांनी संविधान बदललं जाणार अशा आशयाचं विधान केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर दलित समाजाने पण मोदी आणि शाह यांच्या भाजपच्या विरोधात मतदान केलं. ४) लोकसभेला जे घडलं ते विधानसभेला घडेल असं समजू नका. विधानसभेला मतदार त्यांच्याशी सगळ्याच पक्षांनी ज्या पद्धतीने प्रतारणा केली त्याला लोकं विधानसभेत या सगळ्या पक्षांना योग्य उत्तर देणार हे नक्की. ५) महाराष्ट्रात जातीचं राजकरण हे शरद पवारांनी सुरु केलं. शरद पवारांनी अगदी पुलोदपासून फोडाफोडीचं राजकारण सुरु केलं ते आजपर्यंत सुरु आहे आणि पुढे महाराष्ट्रात जातीजातीत विष कालवलं. १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानपनेनंतर महाराष्ट्रात जातीचं विष पसरवायला सुरुवात झाली आणि दुर्दैवाने ,ते विष आज खूप खोलवर रुजलं आहे. ६) जातीचं राजकारण चालतंय हे पाहून सगळे पक्षच आता ते करू पाहत आहेत. पण हा विषय फक्त विधानसभा निवडणुकांपर्यंत मर्यादित विषय नाही. एकूणच समाज विस्कटला आहे. लहान मुलांच्या मनात जर जातीची जाणीव निर्माण होत असेल तर हे गंभीर आहे. ७) मी वरळीत मागच्या वेळेस उमेदवार दिला नव्हता पण जे झालं ते झालं. या वेळेस फक्त वरळीतच नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारसंघात उमेदवार देणार आहे, मग तो मतदारसंघ कोणाचाही असो. ८) लाडकी बहीण असो की कोणतीही योजना असो लोकांना पैसे मिळणार असतील तर लोकं पैसे घेतील पण म्हणून मतदान करतीलच असं नाही. लोकं हुशार असतात. त्यांना हेतू कळतात. ९) बदलापूरमध्ये जे घडलं ते भीषण आणि दुर्दैवी आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा विषय लावून धरला. पण महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. बलात्कार ते हुंडाबळी ते छेडछाड या घटना वर्षागणिक वाढत आहेत. २०२३ मध्ये महाराष्ट्रात ७००० हुन अधिक बलात्काराच्या घटना घडल्या ज्यांची पोलिसांकडे नोंद झाली. ज्याची नोंद नाही झाली अशी प्रकरणं त्याहून अधिक आहेत. बीड,सांगली येथे ऊसतोड कामगार महिलांची गर्भाशयं काढून घेण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. आणि इतक्या घटना घडून पण कठोर कायदे नाहीत. दिल्लीत निर्भया प्रकरण घडलं. त्या निर्घृण प्रकारातील दोषींना फाशी झाली तब्बल १२ वर्षांनी. इतका वेळ लागतोच कसा ? बरं, असं नाहीये महायुती सरकारच्या काळात महिलांवरचे अत्याचार वाढलेत, तर हे अत्याचार महाविकास आघाडी सरकारच्या काळात पण घडले होते. पण आज दोघेही एकमेकांवर फक्त दोषारोप करत आहेत, पण या घटनांबद्दल कोणीच गंभीर नाही हे दुर्दैव आहे. १०) जरांगे पाटील उपोषणाला बसले, त्यावेळेस लाठीचार्ज झाला. त्यावेळेस कारवाई कोणावर झाली पोलिसांवर? पण पोलिसांना आदेश कोणी दिला ? त्यांची काही जबाबदारी नाही का?११) मागे एकदा मी लंडनला गेलेलो असताना तिकडे बॉम्बस्फोट झाले होते. त्यावेळेस पोलिसांनी कारवाई सुरु केली, त्या कारवाईत एक निरपराध माणूस मारला गेला. त्यावेळेस पोलिसांनी माफी मागितली पण त्याचं राजकारण नाही झालं. आपल्याकडे पण पोलिसाना सगळं माहीत असतं, फक्त त्यांना फ्रीहँड देणार आहात का ? मी नेहमी म्हणतो की सत्तेत आलो तर सगळ्यांना सुतासारखं सरळ करेन, म्हणजे कायकरेन? तर, मी सत्तेत आलो तर पोलिसाना कारवाई करण्यास फ्रीहँड देईन. आणि मग बघा कसा महाराष्ट्र सुतासारखा सरळ होईल ते. अहो पोलिसांचे हात बांधायचे आणि त्यांना सांगायचं की कारवाई करा, कसं शक्य आहे?१२) लोकांना सगळ्या गोष्टी मोफत देऊ नका. लोकांना खरंतर काहीच फुकट नको असतं. लोकांना हाताला काम हवं आहे, नुसते पैसे नको आहे, शेतकऱ्यांना मोफत वीज नको असते, त्यांना स्वस्त आणि २४ तास वीज हवी असते. आणि अशा योजना राज्याला घातक आहेत. बरं हे सगळं कोणाच्या जीवावर लोकांच्या पैशातूनच करता ना? मला असं वाटतं एक, दोन महिने लाडकी बहीण योजनेचे पैसे देतील, पुढे देऊ शकतील असं वाटत नाही कारण राज्याकडे पैसेच नाहीत. १३) आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही २००,२२५ सीट्स नक्की लढवणार आहोत . १४) माझे सहकारी मला अनेकवेळा म्हणतात की जरा खरं बोलणं कमी करा. पण मला वाटत नाही मला जमेल असं, कारण सुधरण्याचं आणि बिघडण्याचं पण एक वय असतं ते निघून गेलं. त्यामुळे मी आयुष्यभर जे खरं आहे तेच बोलणार…