पुणे, दि. २३: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील भात, नाचणी, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, मूग, उडीद, तूर व खरीप कांदा पिकांचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत विमा कंपनीस पिकांच्या नुकसानीबाबत सूचित करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातून ३ लाख ५० हजार शेतकऱ्यांनी १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. या योजनेंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, गारपीट, भुस्खलन, ढगफुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग अशा स्थानीक घटनांमुळे विमा संरक्षित पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करुन नुकसानभरपाई निश्चित करण्यात येते. तसेच काढणी पश्चात नुकसानीअंतर्गत पिकाच्या काढणीनंतर १४ दिवसाच्या आत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित करण्यात येते.
पिकांचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या विमा संरक्षित पिकांचे नुकसान झाले असल्यास ७२ तासाच्या आत नुकसानग्रस्त पिकाच्या छायाचित्रासह विमा कंपनीस सूचित करावे. त्यासाठी कृषी रक्षक संकेतस्थळ व टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक १४४४७ किंवा https://pmfby.gov.in संकेतस्थळ किंवा क्रॉप इन्शुरन्स अॅप या पर्यायांचा अवलंब करावा.
जिल्ह्यात एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कं.लि. या विमा कंपनीमार्फत विमा योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नुकसानीबाबतची सूचना प्राप्त झाल्यानंतर वैयक्तिकस्तरावर नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची तरतूद पीक विमा योजनेत आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभागाचे कार्यालय व संबंधित गावचे कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. काचोळे यांनी केले आहे.