पुणे, दि. २३ ऑगस्ट, २०२४ : छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातील औंध परिसरात असणाऱ्या चिखलवाडी भागातील विविध प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी येथील स्थानिक नागरीकांना दिली आहे. नुकतीच शिरोळे यांनी या भागाची पाहणी करीत तेथील प्रश्न समजावून घेतले. पुणे महानगर पालिका उपायुक्त गिरीश धापकेकर, पाणी पुरवठा विभागाचे प्रसन्न जोशी तसेच अन्य विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या भागात ड्रेनेजच्या पाण्याचे, स्वच्छ्तागृहांच्या देखभालीचे, पाणी पुरवठ्याचे, आरोग्य व वीज पुरवठा असे अनेक प्रश्न असून त्यांची माहिती शिरोळे यांनी घेतली. पावसामुळे ड्रेनेजचे पाणी साचते हा महत्वाचा प्रश्न यावेळी नागरिकांनी निदर्शनास आणून दिला. त्याची तातडीने सोडवणूक करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. तसेच अन्य प्रश्नाकडे नागरिकांनी आमदार शिरोळे यांचे लक्ष वेधले. त्यावर आमदार शिरोळे यांनी प्रश्न सोडविण्यात येतील असे सांगितले. शिवाय लागलीच या संदर्भात योग्य कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना दिले. लवकरच ड्रेनेज लाईनचा प्रश्न सोडविण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येईल असे शिरोळे यांनी सांगितले.
या पाहणीवेळी सर्वश्री आनंद छाजेड, अभय सावंत, कमलेश चासकर, सचिन वाडेकर, शाम काची, अनिल भिसे, अजित पवार, बाळू सोरटे, गणेश पोलकम, सुभाष पाडळे, देवेंद्र बिडलान, अभिषेक वाकीकर, अतुल गायकवाड आणि रिटा उपाध्याय हे देखील उपस्थित होते.