सर्वोच्च न्यायालयाच्या कलम 370 वरील निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात झाली आहे. आता तिथे मोकळ्या वातावरणात निवडणुका होतील. विशेषतः केंद्राने पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे सूतोवाच केल्यामुळे तो प्रदेशही लवकरच भारतात सामील करवून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या कलम 370 वरील निर्णयाचे स्वागत केले आहे.
जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्दबातल करण्याचा केंद्राचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या योग्य होता, असा ऐतिहासिक निर्वाळा आज सुप्रीम कोर्टाने दिला. कोर्टाच्या या निर्णयानंतर देशभरातून विविध प्रतिक्रिया येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर भाष्य केले आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंबंधी आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयामुळे एका ऐतिहासिक पर्वाचा प्रारंभ होत आहे. देशाची राजकीय एकात्मता राखणारे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी उचलले होते, ते कोर्टाने आज वैध ठरवले त्या बद्दल मी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे अभिनंदन करतो.
जम्मू काश्मीर मधील दहशतवाद संपून ते देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तिथे आता मुक्त वातावरणात निवडणूक होईल. मला एक दिवस पंतप्रधान करा, मी काश्मीरवर लादलेले कलम 370 रद्द करतो, असे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणत. मोदींनी हिंमतीने तो निर्णय घेऊन बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली, असे शिंदे म्हणाले.
काही विघ्नसंतोषी मंडळी काश्मीरला पुन्हा वेगळे पाडू इच्छितात. मात्र त्यांचे हे प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडले आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याचे सुतोवाच केंद्राने केले आहेच. तो प्रदेश भारतात सामील करुन घेण्याच्या दृष्टीनेही आता प्रयत्न होतील हे नक्की, असे शिंदे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

