पुणे, दि. १६ : इत्तर मागास बहुजन कल्याण विभागाच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचा दृष्टीकोनातून इतर मागास बहुजन विभागाच्यावतीने शिवाजीनगर प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या मेळाव्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी, सहसंचालक संतोष हराळे, प्रादेशिक उपसंचालक खुशाल गायकवाड, सहायक संचालक विशाल लोंढे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. श्रीकांत देशमुख, कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या प्रायार्या डॉ. कल्याणी जोशी, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉर्मस अॅण्ड सायन्सचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव, जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था व महाविद्यालयातील शिष्यवृत्ती संदर्भातील कामकाज करणारे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. खिलारी यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आश्रमशाळा, भारत सरकार शिष्यवृत्ती योजना, वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आदी योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना कसा मिळेल यासाठी शिक्षण संस्थांनी प्रयत्नशील रहावे. तसेच विद्यार्थ्यांनीही या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
श्री. गायकवाड यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत थोडक्यात माहिती देवून विभागाचे पुढील ध्येय व धोरणाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
श्री. लोंढे यांनी, इतर मागास बहुजन कल्याण विभागातील विविध योजनांची माहिती पुस्तीका ‘उत्कर्ष बहुजनांचा’ याचा क्युआर कोड उपलब्ध करून देण्यात आला असून यामार्फत विभागाची माहिती पुस्तीका डाऊनलोड करून तळागळातील लोकांपर्यंत विभागाच्या योजनांचा प्रचार व प्रसार करावा, असे आवाहन केले.
यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा सत्कार श्री. खिलारे यांच्या हस्ते करण्यात आला.