पुणे, 13 ऑगस्ट 24
.
भारतीय माहिती सेवातील (IIS) 1995 च्या तुकडीचे अधिकारी धीरज सिंग यांनी पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) चे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.
अलाहाबाद विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) शिक्षण घेतलेल्या सिंग यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एमए आणि एम फिल केले आहे. याशिवाय त्यांनी बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात अतिथी तज्ञ म्हणून योगदान दिले आहे.
आपल्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रसार माध्यमे, संपर्क आणि सार्वजनिक धोरण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. पत्र सूचना कार्यालयांमधील (पीआयबी ) त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती सचिवालय तसेच आरोग्य आणि वाणिज्य यासह अनेक महत्त्वाच्या मंत्रालयांसाठी प्रसार माध्यम आणि संपर्क हाताळला आहे. स्वच्छ भारत मिशन सारख्या उल्लेखनीय उपक्रमांमध्ये देखील सिंग यांनी सहभाग नोंदवला आहे, याशिवाय त्यांनी प्रकाशन विभागासोबतही काम केले आहे.
एक कुशल लेखक म्हणून त्यांनी लिहिलेले ‘मॉडर्न मास्टर्स ऑफ सिनेमा ’ हे पुस्तक चित्रपट सृष्टीतील प्रभावशाली व्यक्तींवर प्रकाश टाकणारे आहे.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) बद्दल अधिक माहिती.
1960 मध्ये स्थापन झालेली आणि सुरुवातीच्या काळात’फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या नावाने ओळखली जाणारी, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील शिक्षणासाठी समर्पित असलेली अग्रगण्य संस्था आहे.
एफटीआयआय ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील एक स्वायत्त संस्था म्हणून कार्यरत आहे . ही संस्था परिषदेद्वारे नियंत्रित केली जात असून संचालकांच्या नेतृत्वाखाली काम करते. दृकश्राव्य माध्यमातील उत्कृष्टतेसाठी जागतिक स्तरावर ओळखली जाणारी, एफटीआयआय ही भारतातील शीर्ष चित्रपट संस्थांपैकी एक आहे. या संस्थेचे माजी विद्यार्थी लॉस एंजेलिस, पॅरिस, लंडन, मुंबई, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या शहरांमध्ये काम करत जगभरात प्रसिद्ध झाले आहेत. या माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ऑस्कर, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्म पुरस्कारांसह प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले आहेत.
आपल्या स्थापनेपासून पाच अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या एफटीआयआय ने आता चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील विविध विषयांमध्ये अकरा पूर्ण-वेळ अभ्यासक्रम आणि असंख्य अल्प-मुदतीच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण देण्यापर्यंत मजल मारली आहे. हे अभ्यासक्रम पुण्यातील संस्था परिसरात आणि संपूर्ण भारतातील विविध केंद्रांवर उपलब्ध करून दिले जातात.