केंद्रीय संचार ब्युरो आणि जगद्गुरू इंग्लिश मीडियम स्कूलच्या देहू गांव येथील रॅलीत दुमदुमला ‘हर घर तिरंगा’चा जयघोष
पुणे, 13 ऑगस्ट 2024
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाअंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने देहू गांव येथील जगद्गुरू इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या सहकार्याने आज ‘हर घर तिरंगा रॅली’ अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आली. जगद्गुरू इंग्लिश मीडियम स्कूलच्या सुमारे 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी दिलेल्या ‘घर घर तिरंगा, हर घर तिरंगा’, ‘मेरा तिरंगा, मेरी शान’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ आदी घोषणांनी देहू गांव परिसर चैतन्यमय झाल्याचे पाहायला मिळाले.
याप्रसंगी देहू नगरपंचायतीचे उप मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर शिंदे, प्रशासकीय अधिकारी रामदास भांगे, जगद्गुरू इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन संतोष साकोरे, मुख्याध्यापिका मिनाक्षी गाडेकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी हर्षल आकुडे, क्षेत्रीय प्रचार सहायक पी. फणीकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या वतीने देशभरात 9 ते 15 ऑगस्टदरम्यान हर घर तिरंगा अभियान जोरदार उत्साहात राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे प्रादेशिक कार्यालयामार्फत देहू गांव येथील जगद्गुरू इंग्लिश मीडियम स्कूल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाअंतर्गत हर घर तिरंगा रॅलीसोबतच शाळेत वक्तृत्व, रांगोळी, घोषवाक्य, चित्रकला आदी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. यासोबतच तिरंगा सेल्फी पॉईंट आणि 14 ऑगस्ट फाळणी वेदना स्मृती दिनसंदर्भातील छायाचित्रांचे प्रदर्शनही शाळेत आयोजित करण्यात आले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशाच्या फाळणीमुळे देशवासीयांना सोसाव्या लागलेल्या वेदना आणि विस्थापित झालेल्या नागरिकांच्या दुःखाबाबत माहिती देण्यात आली.
अखेरीस, मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारताच्या तिरंगा झेंड्याचे पावित्र्य कसे राखावे, याबाबत सूचना दिल्या. तसेच, सर्व विद्यार्थी देहू गांव येथील सर्व नागरिकांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकावून हर घर तिरंगा अभियानात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय संचार ब्युरोमार्फत करण्यात आले.