बोट, बाईक व ५ जी तंत्रज्ञानयुक्त रुग्णवाहिकांची नागरिकांना प्रतीक्षा
पुणे (प्रतिनिधी) : राज्यात १०८ रुग्णवाहिकांच्या संख्यते वाढ करण्याची मागणी सातत्याने होत होती. नागरिकांची मागणी लक्षात घेता, राज्य शासनाच्या वतीने सदर निविदेची वर्क ऑर्डर नुकतीच काढली आहे. परंतू मंत्रिमंडळ मंजुरीचा निर्णय मात्र प्रलंबित ठेवला आहे. नवीन निविदेनुसार बोट, बाईक व ५ जी तंत्रज्ञानयुक्त रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. विशेषबाब म्हणजे नवजात शिशूंसाठी वेगळी रुग्णवाहिका नव्या निविदेत असणार आहे. निविदेसंदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. तरी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीव्हीजी व सुमित फॅसिलिटी यांची निविदा थांबवली असल्याचा खोडसाळ प्रचार करण्यात आला.
निविदेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यात सुसज्ज अत्याधुनिक आपत्कालीन कक्ष उभारण्यास चालना मिळणार आहे. त्याचबरोबर डॉक्टर, इंजिनियर व पॅरामेडिकल स्टाफ असे एकूण १२,००० रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. अगामी काळात बीव्हीजी व सुमित फॅसिलीटी लिमिटेड यांच्या वतीने राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा देण्यात येणार आहे.
नवीन निविदेनुसार १७५६ रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात सेवा देणार आहे. यात ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट (ए.एल.एस) व बेसिक लाईफ सपोर्ट (बी.एल.एस) या रुग्णवाहिकांचा समावेश आहे. आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेत बोट रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. समुद्रतट,व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांना बोट रुग्णवाहिकांचा लाभ घेता येणार आहे. अलिबाग परिसरातील रुग्णांना महामार्गाने मुंबईला जाण्यासाठी ५ ते ६ तासाचा अवधी लागतो. बोट रुग्णवाहिकेमुळे अलिबागकरांना अवघ्या ३० मिनिटात मुंबईतील अद्यावत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सुविधा मिळणार आहे. मुंबई शहरातील धारावी, विदर्भातील मेळघाट, चिखलदरा या भागात रुग्णवाहिका पोहचत नाही. या ठिकाणी बाईक रुग्णवाहिकेद्वारे आपत्कालीन सेवा देण्यात येणार आहे.
आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेत नव्या निविदेनुसार ५ जी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी कॅमेराद्वारे रुग्णाशी सातत्याने संपर्कात राहण्यास मदत होणार आहे. राज्यातील नागरीक अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेण्यासाठी मंत्रीमंडळच्या निर्णयाची वाट पहात आहे.
गेल्या १० वर्षात १ कोटी पेक्षा अधिक नागरिकांनी १०८ रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला आहे. विशेषबाब म्हणजे या सेवेमुळे १५ लाखा पेक्षा अधिक रुग्णांचा जीव वाचला आहे. ग्रामिण व शहरी भागात ४० हजार प्रसूती रुग्णवाहिकेत झाल्या आहेत. करोना सारख्या भयावह आजाराच्या कालखंडात ९६ टक्के रुग्णवाहिका सुरु होत्या. या दरम्यान ६.५० लाख रुग्णांना सदर सेवेचा लाभ झाला होता.
सद्यस्थितीत रुग्णवाहिकांची संख्या
ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट : २३३
बेसिक लाईफ सपोर्ट : ७०४
बाईक ॲंब्युलंन्स : ३३
नव्याने वाढणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या
ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट : २५५
बेसिक लाईफ सपोर्ट : १२७४
बाईक ॲंब्युलंन्स : १९६
नवजात शिशुंसाठी रुग्णवाहिका : २५
बोट ॲंब्युलन्स : ३६
पुरस्कार
राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा सुरु झाल्यानंतर काही दिवसातच प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार बीव्हीजी संस्थेला मिळाला होता. त्याचबरोबर जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात १०८ रुग्णवाहिका सेवेचा पेपर प्रसिद्ध करण्यात आला होता. नेचर विद्यापीठाने देखिल आपत्कालीन वैद्यकीय सेवेला सन्मानित केले आहे.