अकोला: अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. 24 वर्षांचा मनसे कार्यकर्ता जय मालोकर याचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे.आंदोलनानंतर त्याला हृदयविकाराचा धक्का आला यानंतर त्याला ताबडतोब खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र रुग्णालयातच त्याची प्राणज्योत मालवली आहे. जय मालोकरच्या अचानक जाण्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
पुणे दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी पुण्याच्या पुरावरून अजित पवारांवर निशाणा साधला होता, यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा उल्लेख सुपारीबाज असा केला. यानंतर मनसे आणि अमोल मिटकरी यांच्यातला वाद उफाळून आला. अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात पार्क करण्यात आलेल्या अमोल मिटकरींच्या कारला मनसे कार्यकर्त्यांनी लक्ष्य केलं. झाडाची कुंडी आणि मोठे दगड टाकत अमोल मिटकरींच्या कारची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली, यात मिटकरींच्या कारचं नुकसान झालं.
अमोल मिटकरी अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात आले होते, याची माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहात धडक दिली. मिटकरी थांबलेल्या शासकीय विश्रामगृहाच्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्त्यांनी केलाय, मात्र मिटकरींच्या समर्थकांनी आणि पोलिसाने या सर्वांना रोखून धरलं. या हल्ल्यानंतर अमोल मिटकरी यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. मनसेला महायुतीतून लाथ मारून बाहेर काढा, असं आवाहन अमोल मिटकरींनी महायुतीतल्या नेत्यांना केलं आहे.
‘मनसेच्या भ्याड गुंडांनी जो हल्ला केला त्याचा हिशोब चुकता करेन. मिटकरीच्या गाडीची काच फोडल्यानंतर राज ठाकरे आपल्याला पुरस्कार देतील, असं त्यांना वाटत असेल तर त्यांना हेही सांगतो. आजपर्यंत अशाप्रकारे सुपाऱ्या घेऊ घेऊन तुमचा नेता शांत बसला होता. ज्या पक्षाचं अस्तित्वच राज्यात नाही तो अशाप्रकारे राष्ट्रवादीची रेषा खोडून महायुतीत मोठा व्हायचा प्रयत्न करतोय. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगतो, अशा खुनशी पक्षाला सोबत घेऊन सत्तेत यायचं स्वप्न पाहात असाल तर महाराष्ट्रातली जनता अशा लोकांना कधीही मतदान करणार नाही. यांना लाथा घालून महायुतीतून बाहेर काढा’, असं आवाहन मिटकरींनी केलं आहे.