मुंबई-शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाणांनी भर पत्रकार परिषदेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा व्हिडिओ ऐकवला आहे. सोमवारीच विद्या चव्हाण यांनी पेनड्राईव्ह बॅाम्ब टाकणार, तुमचे कारनामे उघड करणार असा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आज ऑडिओ ऐकवला असून चित्रा वाघ या इतरांचा वापर करून सापशिडीवर पुढे जाणाऱ्या नेत्या आहेत अशी टीका विद्या चव्हाण यांनी केली आहे.
ऑडिओमध्ये नेमके काय?
विद्या चव्हाण यांनी या ऑडिओमध्ये काय आहे याबाबत बोलतांना सांगितले की, चित्रा वाघ यांनी माझ्या सुनेला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. मी तिचा छळ कसा केला होता हे बोलायला त्या माझ्या सुनेला सांगत होत्या. विशेष म्हणजे फडणवीसांनीच असे करायला सांगितले आहे असे चित्रा वाघ यामध्ये बोलल्या आहेत”, असे विद्या चव्हाण म्हणाल्या. माझी बदनामी करण्यासाठी हे सर्व करण्यात आले. या क्लिप्स माझ्याकडे पाच ते सहा महिन्यांपूर्वी आल्या असा गंभीर आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे.
पुढे विद्या चव्हाण म्हणाल्या, ”एखाद्याच्या घरात काही होत नसेल तर त्याला वेगळं वळण द्यायचं. हे लोकं कशाप्रकारे त्रास देऊ शकतात याचे हे उदाहरण आहे. माझ्या घरातील लोकं राजकारणात नसताना, अशाप्रकारे त्यांना खोटं बोलायला लावणं, सूनेला वकिलांचं पॅनेल देणं, तिला अडीच-तीन लाखांची नोकरी देणं, पार्ल्यात घर मिळवून देणं आणि मला छळायचं”, असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला.
काय म्हणाल्या विद्या चव्हाण?
दरम्यान, सोमवारीच व्हिडिओ जारी करत विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांना इशारा दिला होता. विद्या चव्हाण यांनी ”बजेटमध्ये राज्याला भरभरून दिले अशा थापा तुम्ही मारल्या. आम्ही फेक नरेटीव्ह करतो असा आरोप करता. शरद पवार पित्रुतुल्य आहेत असे सांगता, आता त्याच पवारांना शरद अली म्हणता. राज्याला ज्या पत्रकारांनी, समाजसेवकांनी दिशा दिली, त्यांचा उल्लेख पोपट असा करता. तुमच्यासारख्या खोटारड्या, बनेल, ब्लॅकमेलिंग करणारी, पक्षात मोठे पद मिळवण्यासाठी काहीही करू शकते, हे आम्ही जवळून पाहिले आहे, असा शब्दांत चव्हाण यांनी वाघ यांचा समाचार घेतला आहे.तसेच पुढे त्या म्हणाल्या, आम्ही विकासाची कामे करतो म्हणत फडणवीस काहीही करू शकतात याचा पाढाच वकिलांसमोर वाचला आहे. तो अनुभव मी घेतेय. हे खोटे वाटत असेल त्याबाबतचा हा पेनड्राईव्ह आहे. यात चित्रा वाघ काय-काय बोलतात, काय-काय करतात, त्यांचे कारनामे यात आहेत. हे कारनामे पाहायचे, ऐकायचे असतील तर मंगळवारी दुपारी 3 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात समजतील. त्यांचे कारनामे राज्यातील जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही”, असे विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत.