पुणे, दि. २९ जुलै २०२४: महापारेषणच्या जेजुरी ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रात सोमवारी (दि. २९) रात्री ८.११ वाजता बिघाड झाला. त्यामुळे पुणे शहराच्या काही भागात अर्धा तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महापारेषणकडून तातडीने तांत्रिक उपाययोजना करण्यात आली व त्यानंतर रात्री ८.३८ वाजता सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला.
याबाबत माहिती अशी की, जेजुरी अतिउच्चदाब उपकेंद्रातील तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पारेषणमध्ये विजेची तूट निर्माण झाली. त्यामुळे पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘एलटीएस’ (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली आणि फुरसुंगी, पर्वती आणि नांदेड सिटी या २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांचाही वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे पर्वती, नांदेड सिटी, सिंहगड रस्ता, वडगाव धायरी, पेशवेपार्क, नवी पेठ, भारती विद्यापीठ, आंबेगाव, गंगा व्हिलेज, काळेपडळ, मोहंमदवाडी, सय्यदनगर, उंड्री, पिसोळी, मांजरी, भेकराईनगर आदी भागांधील सुमारे पावणेतीन लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा अर्धा तास खंडित झाला होता.