पुणे, दि. २९: महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती ‘क’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि निर्वाह भत्ता उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याकरीता मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६० हजार रुपये, इतर महसुली विभागीय शहरे व उर्वरित क वर्ग महानगरपालिकाक्षेत्रात ५१ हजार रुपये, इतर जिल्ह्याचे ठिकाणी ४३ हजार आणि तालुक्याच्या ठिकाणी ३८ हजार रुपये लाभाच्या स्वरुपात देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरीता पालकांचे उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा कमी असावे.
योजनेकरीता अर्ज आपल्या महाविद्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, पुणे कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन क्र.१०४/१०५ येरवडा पोलीस स्टेशन समोर, विश्रांतवाडी, पुणे- ६ येथे संपर्क करावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विशाल लोंढे यांनी केले आहे.