मुंबई-अजितदादा यांच्यासारख्या परखड व्यक्तिमत्त्वाला जर तोंड लपवून जावे लागतं असेल तर हे अतिशय वाईट आहे. हा एक प्रकारचा स्वाभिमान गहाण ठेवण्यासारखा प्रकार आहे, अशी खोचक टीका अंबादास दानवे यांनी केली.
भाजपसोबत सत्तास्थापन करण्यासाठी मी अमित शहांसोबत 10 बैठका केल्या. या बैठकांना जाण्यासाठी मला तोंडाला मास्क व टोपी घालून जावे लागायचे, असा खुलासा खुद्द अजित पवार यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना केला. दादांच्या या विधानावर ठाकरे गटाचे नेते तथा विरोधी पक्ष नेते दानवे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली.
भाजप आतापर्यंत कायम कूटनीतीचे राजकारण करत आली आहे. त्यांची किती खालच्या स्तराची मानसिकता आहे, हे वेळोवेळी दिसून आले आहे. कोर्टाने अनिल देशमुख यांच्यावर स्पष्ट भूमिका दिली आहे. दृष्टपणाचे हे वागणे भाजपचेच आहे, असा आरोप देखील अंबादास दानवे यांनी केला.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राज्याच्या राजकरणात मोठ्या घडामोडी घडत आहे. अशातच जागावाटपात महायुती मध्ये वाद निर्माण झाल्याच्या चर्चा आहे. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, प्रत्येक पक्ष आपली भूमिका ठरवत असतो आणि ते नेते ठरवत असतात. नारायण राणे यांना किती पक्ष किंमत देतो हे पाहावे. त्यांनी बाकी अजितदादा आणि आमच्या गद्दारांना किती तुकडे टाकतात, ते पाहावे लागेल, असाही टोला दानवे यांनी लगावला.
दरम्यान लव्ह जिहाद प्रकरणावरुन दानवे यांनी नितेश राणे यांच्यावर देखील निशाणा साधलाय. माझे नितेश राणे यांना आव्हान आहे की असे प्रकार होत असतील तर त्यावर कारवाई करा. राज्यात आणि देशात तुमचे सरकार आहे. असे असताना कारवाई होत नसेल तर याचा अर्थ म्हणजे तुम्ही प्रोत्साहन देताय का? तुम्ही तुमच्या राज्यात यावर कारवाई करा, असेही दानवे म्हणाले.
सत्तेसाठी अजितदादांनी स्वाभिमान गहाण ठेवला:अंबादास दानवेंचा टोला
Date: