पुणे :नवाब मलिक यांना महायुतीत घेण्याला फडणवीसांनी विरोध दर्शवला आहे. यावरुन आता राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्यानं उडी घेत साध्वी प्रज्ञासिंह यांचा दाखला देत थेट देवेंद्र फडणवीस यांना निशाणा बनवलं आहे.नवाब मलिक यांना टार्गेट करणाऱ्या फडणवीसांविरोधात राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपली भूमिका मांडली.
नवाब मलिक यांनी विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभेत हजेरी लावली. यावेळी ते सत्ताधारी पक्षाच्या बाकांवर जाऊन बसले याचाच अर्थ असा की त्यांनी शरद पवारांची नव्हे तर अजित पवारांच्या बाजूनं जाणं स्विकारलं.पण यावरुन सभागृहात विरोधीपक्षानं भाजपला टार्गेट केल्यानंतर फडणवीसांनी अजितदादांना पत्र लिहित आणि ते ट्विटरवरुन सार्वजनिक करत मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध दर्शवला आणि सत्तेपेक्षा आमच्यासाठी देशहित महत्वाचं असं म्हटलं. पण त्यांच्या या विधानामुळं त्यांना ट्रोल व्हावं लागलं आहे.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्विट करुन त्यांनी म्हटलं की, भाजपनं साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर आतंकवादाचे आरोप होऊनही त्यांना खासदारकीची उमेदवार दिली. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्यावर तर देशद्रोह आरोप झाले. पण गुन्हा सिद्ध झालेला नाही ते केवळ आरोप आहेत.आपलं राज्य कायद्यानुसार चालतं आणि चालणार. आपला तो बाब्या लोकांचं ते कार्ट असं करणं अशोभनीय आहे, अशा शब्दांत ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे.भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर सन २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा कट रचल्याप्रकरणात आरोपी आहेत. त्यांच्यावर देशविघातक कृत्यांच्या कलमांखाली गुन्हे दाखल झाले होते, यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. काही वर्षांपूर्वी त्यांच्यावरील मोक्का देखील हटवण्यात आला. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आणि त्यांना भोपाळमधून भाजपनं लोकसभेसाठी उमेदवारीही दिली. यात त्या निवडून आल्या आणि खासदार बनल्या.

