मुंबई-पुण्यात रविवारी पार पडलेल्या भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. शरद पवारांनी भ्रष्टाचाराला संस्थात्मक स्वरूप दिले असून ते भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत, अशी जहरी टीका केली. या टीकेवर आमदार बच्चू कडू यांनी शहांनाच प्रतिप्रश्न केला आहे. शरद पवार जर सरदार आहेत, मग अजित पवार कोण?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.बच्चू कडू म्हणाले, अमित शहा यांच्या तोंडातून चुकीने शब्द निघाले असतील ते विसरभोळे आहेत. बऱ्याचदा अमित शहा साहेब चुकीचे बोलतात मग नंतर त्यांच्या अंगलट येते. शरद पवार सरदार आहे तर मग अजितदादा कोण आहेत?. शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत आणि अजित पवार यांनी आता परत शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये, यावर देखील त्यांनी भाष्य केले.
लोकसभा निवडणुकीत पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांवर नाव न घेता भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. त्याचे पडसाद निवडणुकीत उमटले आणि भाजपला फटका बसला. राज्यात आता विधानसभेचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपचे अधिवेशन पार पडले. त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर जोरदार टीका करत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.
अमित शाह नेमके काय म्हणाले?
राज्यात भाजपचे सरकार असते त्यावेळी मराठा आरक्षण दिले जाते. तर पवारांचे सरकार आल्यानंतर ते गायब होते. आताही आरक्षणासाठी हालचाली सुरू आहेत. मात्र पुढे पवारांचे सरकार आल्यानंतर त्याची चर्चाही होणार नाही. पवारांनी खोटे बोलून लोकांची मते घेतली. आता त्यांचा घरोघरी जाऊन पर्दाफाश करायचा आहे. असे पवार आता भ्रष्टाचाराबाबत प्रश्न करतात. मात्र देशातील भ्रष्टाचारींचे सरदारच पवार आहेत. त्यांनी भ्रष्टाचारा संस्थात्मक दर्जा दिल्याचा गंभीर आरोपही शहा यांनी केला होता.