मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर शुक्रवारी अचानक डाऊन
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने शुक्रवारी (ता. १९) हिंजवडी, तळवडेसह परिसरातील ‘आयटी’ कंपन्यांची कामे खोळंबली होती. सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत लॅपटॉप आणि संगणक बंद पडले होते.लॉग इन होत नसल्याने कर्मचाऱ्यांना कामे करताना अडचणी येत होत्या. दुपारी चार वाजल्यानंतर मायक्रोसॉफ्टने पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर संथ गतीने कामाला सुरुवात झाल्याचे ‘आयटीयन्स’कडून सांगण्यात आले.
मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर शुक्रवारी अचानक डाऊन झाले. लॅपटॉप आणि संगणकाची स्क्रीन निळी पडत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे काम बंद पडले. कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर माहिती समोर आली.त्याचा फटका जगभरात वेगवेगळ्या क्षेत्रात बसला. बँक, विमानसेवा, आयटी कंपन्या आदी ठिकाणी सर्वच कामे ठप्प झाली. हिंजवडीतील आयटी कंपन्यांनाही त्याचा फटका बसला. अनेक कंपन्यांचे सकाळी नऊ वाजल्यापासून अचानक सर्व्हर डाऊन झाले. अचानक लॅपटॉप- संगणकावर निळी स्क्रीन आली. सर्व कामे बंद झाले. रिस्टार्ट केल्यानंतरही काम सुरू होत नव्हते. हिंजवडीमध्ये सुमारे १२५ आयटी कंपन्यांचा समावेश आहे. हिंजवडीसह, तळवडे, औंध, बाणेर, बालेवाडी, विश्रांतवाडीसह अन्य भागातील आयटी कंपन्यांनाही याचा फटका बसला. अनेक नामांकित कंपन्यांवर कर्मचाऱ्यांना अघोषित सुट्टी देण्याची वेळ आली.
कंपन्यांचे काम ठप्प झाल्याने आयटीयन्सला शुक्रवारी सुटी मिळाली. ‘वीकेंड एक दिवस आधीच सुरू’ अशी चर्चा सुरू होती.