पुणे-केंद्र सरकारच्या वित्त आयोगाकडून वायुप्रदूषण कमी करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसाठी महापालिकेला निधी उपलब्ध झाला आहे. त्या अंतर्गत आजपर्यंत आठ गॅस दाहिन्या उभ्या केल्या आहेत. आता चौदा ठिकाणी गॅस दाहिन्या उभ्या करण्याचा प्रस्ताव आहे. शहराच्या जुन्या हद्दीप्रमाणेच नव्याने समाविष्ट झालेल्या काही गावांच्या स्मशानभूमींचा यात समावेश आहे. या प्रस्तावानुसार तुलसीराम बर्निंग घाट, वाघोली, धानोरी, कोरेगांव पार्क, सुतारवाडी , बाणेर, पाषाण, सूस – म्हाळुंगे, उत्तमनगर, रामटेकडी, मांजरी, कोंढवा खुर्द, येवलेवाडी आणि महंमदवाडी स्मशानभूमी येथे गॅस दाहिन्या उभ्या केल्या जाणार आहेत.
स्मशानभूमीतील अंत्यविधीमुळे वायुप्रदूषण होत असल्याने तेथील नागरिकांना त्याचा त्रास होतो. हे वायुप्रदूषण कमी करण्याची मागणी नागरिक करत आहेत. त्यातच पुण्यातील प्रदूषण गंभीर प्रश्न बनला आहे. यामुळे पालिका चौदा स्मशानभूमीत गॅस दाहिन्या उभारणार आहेत. महापालिकेला यासाठी केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगाकडून १० कोटी निधी मिळाला असून त्यातून याचा खर्च केला जाणार आहे.
पालिकेकडून शहरातील बहुतांशी सर्व ठिकाणी सुसज्ज स्मशानभूमी उभारल्या आहेत. त्यात काही ठिकाणी महापालिकेने विद्युत दाहिनी उभी केली आहे, तर काही ठिकाणी गॅस दाहिन्यांची उभारणी झालेली आहे. पारंपरिक पद्धतीने लाकूड, गोवऱ्यांचा वापर करून अंत्यसंस्कार करण्यावर अनेकांचा भर असतो. परंतु, यामुळे वायुप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी स्मशानभूमीजवळील रहिवाशांकडून केल्या जातात. या पार्श्वभूमीवर महापालिकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: वैकुंठ स्मशानभूमीत या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
येरवडा कैलास स्मशानभूमीत प्रत्येकी २, खराडी, कोथरूड, बाणेर येथे प्रत्येकी १ आणि वैकुंठ स्मशानभूमीत तीन विद्युत दाहिन्यांची व्यवस्था आहे.
विश्रांतवाडी, कोरेगांव पार्क, वडगांव शेरी, पाषाण, धायरी, धनकवडी, हडपसर, वानवडी, मुंढवा, वैकुंठ येथे प्रत्येकी एक गॅस दाहिनी आहे. बिबवेवाडी, बोपोडी, औंधमध्ये प्रत्येकी दोन अशा एकूण १८ गॅस दाहिन्या आहेत.