पुणे :युवक क्रांती दल , भारत जोडो अभियान,संविधान प्रचारक लोकचळवळ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने आयोजित संविधान अभ्यास वर्गाला गुरुवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.
गुरुवार,दि.१८ जुलै २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता कॉन्फरन्स हॉल,एस.एम.जोशी फाउंडेशन सभागृह,पुणे येथे हा वर्ग पार पडला. या अभ्यास वर्गामध्ये ‘पंतप्रधान पदाचे महत्व आणि अधिकार ‘ या विषयावर राज्यशास्त्राचे आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक प्रा.अविनाश कोल्हे यांनी मार्गदर्शन केले.
संविधान प्रचारक नीलम पंडित यांनी प्रास्ताविक केले. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.मनीष देशपांडे यांनी स्वागत केले.पंतप्रधानपदाबाबत संविधानातील तरतुदींची , अधिकार, कर्तव्ये यांची माहिती प्रा. कोल्हे यांनी दिली.
प्रा.कोल्हे म्हणाले,’लोकशाही देशात पंतप्रधानपद हे महत्वाचे पद आहे. हे महत्व आणि अधिकार समजून घेतले पाहिजेत.संसदेतील चर्चा, प्रश्न गांभीर्याने घ्यावे लागतात. जनमत काय तयार होते, याची दखल घ्यावी लागते.
भारतीय लोकशाही हे आदर्श प्रारुप आहे. राजेशाही, एकाधिकारशाही नाही.
भारतातील संसदीय राज्य पद्धतीत नवीन पंतप्रधानाला विश्र्वासदर्शक प्रस्ताव जिंकावा लागतो.विश्वासदर्शक प्रस्ताव हरल्यास पंतप्रधानपद सोडावे लागते.
देशात काय घडामोडी चालू आहेत, हे सांगण्याची जबाबदारी पंतप्रधानांवर आहे. काही संकेत आणि प्रथांबाबत त्यांनी माहिती दिली. देशाचा कारभार चालविण्याबाबत महत्वाचे अधिकार पंतप्रधानांकडे आहेत. राष्ट्रीय धोरण ठरविण्यात पंतप्रधानांचा सिंहाचा वाटा असतो.
मंत्रीमंडळाचे खातेवाटप, नव्या नियुक्त्या, हकालपट्ट्या असे अनेक निर्णय पंतप्रधान घेतात. पंतप्रधानांचा राजीनामा हा सर्व मंत्रीमंडळाचा राजीनामा असतो. लोकसभेच्या विसर्जनाचा सल्ला राष्ट्रपतीना पंतप्रधान देवू शकतात. संसदेची सत्रे कधी आयोजित करावीत याचाही सल्ला ते देतात.
देशाला पंतप्रधान नाही, अशी वेळ कधीच येत नाही. सरकार नसले तरी काळजीवाहू पंतप्रधान कार्यरत असतो. म्हणून हे पद महत्वाचे आहे. पंतप्रधान पद शक्तिशाली असले तरी विरोधी पक्ष शक्तिशाली असणे आवश्यक आहे . सत्तेचे संतुलन असणे नेहमीच गरजेचे आहे.