आबा बागुल म्हणाले,आता एक एक उमेदवारी महत्वाची आहे. मी पवार साहेबांना विनंती केली कि, पर्वती विधानसभा ही काँग्रेसला सोडा.यापूर्वी राष्ट्रवादीला या मतदार संघातून कायम अपयश आले,ते यश मी खेचून आणून देऊ शकतो,साहेब म्हणाले, निवडून जर येणार असेल तर आम्ही नक्की विचार करू. गेली ३० ४० वर्ष मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. महाविकास आघाडीत अनेक जण इच्छुक आहेत तर तुम्हाला संधी मिळेल का? असे बागुल यांना विचारले असता ते म्हणाले, शेवटी पक्षश्रेष्टी ठरवतील ते होणार, पक्षश्रेष्ठीचा आदेश महत्वाचा असतो. मी निवडणुकीवर ठाम असून काही होत नाही. मी फक्त विनंती करणार आहे. पण मला उमेदवारी मिळाली तर १०० टक्के आमदार होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
पुणे : विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याआधीच पर्वती विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच सुरू झालीये. भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून ( शरद पवार गटाकडून ) मागून घेण्याच्या प्रयत्नात काँग्रेस आहे.भाजपकडून भिमालेंची बांधणी मजबूत झालेली असताना आणि कॉंग्रेसचे बागुल यांना वातावरण अनुकूल असताना प्रत्यक्षात उमेदवाऱ्या खेचून आणण्यात कोण यश मिळवते याची उत्सुकता लागून आहे. भाजपचे इच्छुक सध्या सरकारी योजनांचा जोरदार प्रचार करत आहेत .या सर्व पार्श्वभूमीवर आज लोकसभेच्या वेळी नाराज झालेले काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आबा बागुल यांनी शरद पवार यांची मोदीबागेत भेट घेतली. या भेटीत त्यांनी शरद पवारांना पर्वती विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले.
दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात या मतदारसंघावरून धुमश्चक्री सुरू आहे. माजी उपमहापौर आबा बागूल काँग्रेसचे आहेत. त्यांना इथून विधानसभा निवडणूक लढवायची आहे, मात्र मतदारसंघच पक्षाकडे नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. सलग ६ वेळा ते नगरसेवक होते. आता आमदार व्हायचेच या इराद्याने ते कामाला लागले आहेत. काहीही करा, पण हा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या, अशी त्यांची मागणी असून त्यासाठी त्यांनी लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करण्याचे, पक्षाच्या कार्यालयासमोर जाहीर आंदोलन करण्याचे उपायही अवलंबून पाहिलेत.