पुणे- महापालिकेची यंत्रणा अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामांच्या पुढे तोकडी आहे असे समजू नका,भल्या भल्या बहाद्दरांची बेकायदा बांधकामे याच महापालिकेच्या बांधकाम आणि अतिक्रमण विभागाने संयुक्तपणे कारवाई करून उध्वस्त केल्याचा इतिहास आहे.तेव्हा पुणेकरांनो आपल्या शेजारी लगतच्या फ्रंट मार्जिन,साईड मार्जिन मधील अतिक्रमणे काढून घ्या..अन्यथा..कारवाईला सामोरे जा..असा स्पष्ट इशारा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नुकतीच महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. त्यावेळी उपस्थित माजी नगरसेवकांनीही रस्त्यांवरील अतिक्रमणांचा मुद्दा उपस्थित केला होता,मोहोळ यांनी राजकीय दबावाला बळी न पडता थेट कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या..त्यानंतर आता वेगाने महापालिकेने रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाईसाठी केलेल्या आराखड्यानुसार अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.पहिल्याच दिवशी फर्ग्युसन रस्त्यावर प्रशासनाने धडक कारवाई करत अतिक्रमणे,दुकानांसमोरील फ्रंट मार्जिन, शेडसह अनधिकृत बांधकामे हटविली.दरम्यान महापालिका प्रशासनाने शहरातील पाच परिमंडळामध्ये अतिक्रमण कारवाईच्या नियोजनाचा आराखडा तयार केला आहे. शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये कारवाई करण्याचे निश्चित झाले होते. २८ जुलैपर्यंत शहरातील पाच परिमंडळानुसार अतिक्रमण कारवाई करण्याचे निश्चित केले. त्यानुसार महापालिका अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडून संयुक्तपणे कारवाई करण्यास सुरुवात झाली.FC रस्त्यावर (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) मागील काही वर्षांत पदपथावरील अतिक्रमणांसह हॉटेल, रेस्टॉरंट, विविध प्रकारच्या दुकानांनी अतिक्रमण केले होते. महापालिका प्रशासनाने पहिल्याच दिवशी फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर धडक कारवाईला सुरुवात केली. सोमवारी सायंकाळी सहा वाजतापोलिस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण विभागाचे पथक रस्त्यावर उतरले. इमारती, दुकाने, हॉटेलसमोर केलेले बेकायदेशीर बांधकाम, शेड जेसीबीच्या साहाय्याने हटविले. याबरोबरच खाद्यपदार्थांचे स्टॉल, चायनीज सेंटर, पान, आइस्क्रीम शॉप, कपड्यांसह विविध प्रकारच्या वस्तू विक्रीच्या स्टॉलवरही कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांच्यासह वरिष्ठ अधिकारी कारवाईदरम्यान उपस्थित होते. काही विक्रेत्यांनी कारवाईला विरोध दर्शवीत महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचाही प्रयत्न केला.विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही कारवाई सुरू करण्यात आली आहे हडपसर परिसरामध्ये सोलापूर रस्त्यावरील भैरोबा नाला ते रविदर्शनपर्यंतच्या रस्त्यावरील अनधिकृत स्टॉल, हातगाड्या, विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. यावेळी दुकाने, गाळ्यांसमोरील जागेत (फ्रंट मार्जिन) केलेले अनधिकृत बांधकाम, शेडही काढले. अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, हडपसर क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त कारवाईत २६ हजार चौरस फूट कच्चे बांधकाम पाडले. थकीत परवाना, अनधिकृत व्यावसायिकांवर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली.याबरोबरच सातारा रस्त्यावरून धनकवडी गावात जाणारा रस्ता,सहकारनगर, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतही रस्ते व पदपथांवरील अतिक्रमण कारवाई करण्यात आली.