वॉशिंग्टन-अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे एका रॅलीत ट्रम्प यांच्यावर गोळीबार करण्यात आला. बटलरमध्ये ते मंचावर बोलत असताना बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. ट्रम्प यांनी उजव्या कानावर हात ठेवला आणि खाली वाकले. सीक्रेट सर्व्हिस एजंट ट्रम्प यांना कव्हर करण्यासाठी तातडीने त्यांच्याजवळ पोहोचले.
सुरक्षा रक्षकांनी डोनाल्ड ट्रम्प यांना उभे राहण्यास मदत केली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आणि कानावर रक्त दिसत होते. यावेळी ट्रम्प यांनी आपली मुठ घट्ट धरली आणि ती हवेत हलवली. त्यानंतर गुप्तहेरांनी ट्रम्प यांना स्टेजवरून उतरवून कारच्या मदतीने रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली.
या घटनेविषयी ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागात गोळी लागली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, मला कानाजवळ एक आवाज जाणवला, त्यामुळे काहीतरी चुकीचे घडल्याची बाब लगेच माझ्या लक्षात आली. खूप रक्तस्त्राव झाला. त्यानंतर काय घडले ते कळाले.मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाला आहे. ट्रम्प आता कुठे जाणार आहेत याबाबत सध्या कोणतीही माहिती नाही. पण ते या रॅलीनंतर न्यू जर्सी येथील त्यांच्या प्रॉपर्टी बेडमिन्स्टर येथे जाणार होते. ट्रम्प रविवारी मिलवॉकी, विस्कॉन्सिनलाही जाणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन सोमवारपासून येथे सुरू होत आहे.