उद्धव ठाकरेंसाठी कॅम्पेन करणार-ममता बॅनर्जी
मुंबई-ममता बॅनर्जी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांनी या दरम्यान उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. सीएम ममता दीदी शरद पवार यांची सुद्धा भेट घेणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बॅनर्जी यांची ठाकरेंसोबतची ही पहिलीच भेट आहे. त्या सपा प्रमुख अखिलेश यादव यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.
मुंबईत ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदही घेतली. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या संविधान हत्या दिवसाच्या निर्णयावर टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, सर्वात जास्त आणीबाणी ही मोदींच्या काळात होत आहे. मोदींनी कोणाशीही चर्चा न करता ३ गुन्हेगारी कायदे लागू केले. अशा प्रकारचे अनेक निर्णय या मोदी सरकारने घेतले आहेत. त्यामुळे मोदींच्या काळात आणीबाणी सारखीच परिस्थिती आहे. आम्ही कधीही आणीबाणीच्या परिस्थितीला मान्य करत नाहीत.
केंद्र सरकारने 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केला आहे. 25 जून 1974 मध्ये या दिवशी आणीबाणी लागू करण्यात आली होती. या निर्णयावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.
ममता पुढे म्हणाल्या- मोदी सरकारमध्ये संतुलन नाही आहे. हे अस्थिर सरकार आहे. तसेच काही खेळी होणार का असे विचारले असता ममता म्हणाल्या की, आता खेळी तर सुरू झाली आहे.
तसेच, त्या म्हणाल्या की, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान पुन्हा महाराष्ट्रात येणार आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी कॅम्पेन करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हिसकावल्याच्या मुद्द्यावर ममता म्हणाल्या की, हे अत्यंत असंविधानिक आहे.
कोलकाताहून मुंबईला प्रयाण करण्यापूर्वी ममता दीदी म्हणाल्या की, मुकेशजींच्या मुलाचे लग्न होणार आहे हे तुम्हा सर्वांना माहीत आहे, म्हणून मी मुंबईला जात आहे. त्यांनी अनेक वेळा आमंत्रण दिले आहे आणि बंगालच्या निमंत्रणावरून मुकेशजींनी स्वतः बिस्वा बांगला (बंगाल बिझनेस समिट) अनेक वेळा हजेरी लावली आहे. मी कदाचित गेले नसते, पण मुकेशजी, त्यांचा मुलगा आणि नीताजींनी मला वारंवार येण्याचा आग्रह केल्यामुळे जात आहे. मी उद्धव यांच्याशी राजकीय चर्चेसाठी भेट घेणार आहे. त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंटही घेतली आहे आणि अखिलेशही पोहोचत आहेत आणि मी त्यांनाही भेटू शकते, असे बॅनर्जी यांनी मुंबईला जाण्यापूर्वी कोलकाता येथे पत्रकारांना सांगितले.