मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधताना आपण तर पुन्हा एकत्र आलेच पाहिजे, असे मोठे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून, भाजप व ठाकरे गटात काही तरी खिचडी शिजत असल्याचा दावा केला जात आहे.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक होत आहे. या निमित्ताने सत्ताधारी व विरोधी बाकावरील सर्वच महत्त्वाचे नेते व आमदार विधिमंडळात पोहोचलेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही या परिसरात आले होते. ते विधानभवनाच्या पायऱ्यांवर आपल्या सहकाऱ्यांसोबत उभे असताना तिथे अचानक भाजप नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील पोहोचले. या दोन्ही नेत्यांनी यावेळी एकमेकांशी हस्तांदोलन करून संवाद साधला. त्यात राऊत यांनी आपण तर पुन्हा एकत्र आलेच पाहिजे, असे विधान करून एकच खळबळ उडवून दिली.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर चंद्रकांत पाटील दिसताच संजय राऊत त्यांच्या दिशेने गेले आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करत म्हणाले – अरे व्वा, मग आपण तर परत एकत्र आले पाहिजे. त्यावर पाटील म्हणाले की, तुमचे हे वाक्य असेल तर मी सुद्धा लाईन घेणार. त्यानंतर राऊत यांनी तत्काळ मी तर नेहमीच लाइन देत असतो, असे मिश्किल विधान केले. त्यांच्या या विधानानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर एकच खसखस पिकली.
संजय राऊत व चंद्रकांत पाटील यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली होती. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना स्वतः संजय राऊत यांनी आपली बाजू स्पष्ट केली. ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील आमचे जुने मित्र आहेत. दिल्लीत आम्ही पंतप्रधान मोदींना भेटतो. अमित शहाही आम्हाला भेटतात आणि हातात हात घेतात. चंद्रकांत पाटील हे राज्याचे मंत्री आहेत.
त्यांचे आणि आमचे काही वैयक्तिक भांडण आहे का? हे भांडण राजकीयदेखील नाही. आमचे भांडण वैचारिक आहे आणि ते तसेच राहील, असे संजय राऊत म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे विधिमंडळ परिसरात राजकीय विरोधकांच्या होणाऱ्या भेटीगाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ परिसरातील लिफ्टमध्ये भेट झाली होती. त्याचीही राजकीय वर्तुळात खमंग चर्चा झाली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही चॉकलेट देत उद्धव ठाकरेंशी संवाद साधला होती. त्याची खूप चर्चा झाली होती.