मुंबई- महाविकास आघाडीने लोकसभेला महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. आता विधानसभेला तर महायुतीचा पार सुपडाच साफ होईल, महाविकास आघाडीला विधानसभेत 288 पैकी 225 जागेवर यश मिळेल, असा विश्वास देखील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला. सुधाकर भालेराव यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात शरद पवार बोलत होते.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला कात्रजचा घाट दाखवलेला आहे. महायुतीचे पानीपत होईल याचा स्वप्नात सुद्धा कोणी विचार केला नसेल. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील बड्या नेत्यांनी विचार केला नव्हता. पण राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या पारड्यात मतं टाकून शिंदे-फडणवीस-पवार या त्रिमुर्तीला जोरदार झटका दिला. तर आता महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये सत्तर हत्तींचं बळ आले आहे. विधासभेला महायुतीचा सुपडाच साफ होईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
लातूर जिल्ह्यातील माजी आमदार सुधाकर भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. वाय बी. चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम आज पार पडला. माजी आमदार सुधाकरराव भालेराव ह्यांच्यासमवेत व्यंकटराव पाटील, प्रल्हाद सूर्यवंशी, बसवराज काळे, भाजपचे राजेंद्र केंद्रे, वसंत शिरसे, लक्ष्मीकांत पाटील, संदीप कुलकर्णी, शिल्पा इंगळे, रमा वाघमारे, बालाजी कारभारी, श्याम कांबळे तसंच नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून श्री. लक्ष्मण मंडाले, श्री. अशोकराव पारडे व सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षात पक्षप्रवेश केला आहे. मनसेचे तालुका उपाध्यक्ष श्री. प्रकाश धोंगडे, अजित पवार गटाचे श्री. शशिकांत ढिकले, सरपंच गंगा म्हाळुंगे, मनोहर खोडे, तालुका उपाध्यक्ष श्री. संतोष कांडेकर, श्री. सोमनाथ अडके, देविदास चव्हाण, श्री. शरद पोखळे, युवक नेते श्री. अजित तिदमे, श्री. निखिल दाते, महेश अनवट, शिवसेनेचे श्री. शिवाजीराव हंडोरे या सर्वांचे पक्षातर्फे सहर्ष स्वागत करण्यात आले. या पक्षप्रवेशा वेळी लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय शेट्ये, परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजयराव गव्हाणे, नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार, सामाजिक न्याय विभाग राज्य प्रमुख पंडित कांबळे, प्रदेशाध्यक्ष युवक मेहबूब शेख, धर्माजी सोनकवडे, श्रीराम पाटील, भरत सूर्यवंशी, चंदन पाटील, श्याम हिरे, माधव गंगापूरे, रेखाताई कदम, सोमेश्वर कदम मदनराव काळे उपस्थित होते.

शरद पवार यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत 10 पैकी 8 खासदार निवडून आले आहेत. ही आता खरी सुरुवात झाल्याचे सांगितले. तर विधानसभेला 288 जागांपैकी 225 पेक्षा जास्त जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल, असा विश्वास मला आहे, असेही शरद पवार म्हणाले.
ज्यांना जनतेने, पक्षाने मान दिला त्या नेत्यांनी आमचा घात केलाय, अशी टीका सुध्दा शरद पवार यांनी अजित पवार गटावर केली. निवडणुका झाल्यावर अनेक लोक सोबत येत आहे. राज्याचे चित्र बदलायचे असेल तर अनेक लोक सोबत येते आहेत. आजच्या पक्ष प्रवेशाला एक महत्त्व आहे . एक उदगीर आणि देवळाली या ठिकाणी गेल्या वेळी NCP चा उमेदवार निवडून आला होता. त्यांनी मतदारांचा घात केला आहे. त्यांनी आता पक्ष बदलला आहे. या दोन्ही ठिकाणी जे निवडून आले होते त्यांनी जनतेचा घात केला आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.
गद्दारांना धडा शिकवा – जयंत पाटील
या पक्षप्रवेश सोहळ्याच्या वेळेला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लातूरमधील गद्दारांना धडा शिकविण्याची जबाबदारी सुधाकर भालेराव यांच्यावर सोपवली. त्यांच्यावर आमचे अनेक दिवसापासून लक्ष होते. त्या मतदार संघात चलबिचल आमच्या सहकार्याची लक्षात आली होती. मातंग समाज त्याच्या पाठीशी आहे. मला आठवतं 2019 साली मंत्रिमंडळ तयार होताना त्यांनी सामाजिक खाते मागितले होते. आमच्या पक्षात तुमच्यामुळे प्रभावी नेतृत्व मिळाले आहे. मराठी माणसाला गद्दारी आवडत नाही. तुम्ही विजय खेचून आणा असे सांगत त्यांनी भालेराव यांना विधानसभेसाठीच जणू लढण्याचे संकेत दिले आहेत.
लातूरमध्ये ऑगस्ट महिन्यात मोठा कार्यक्रम होणार आहे उदगीर आणि अहमदपूर मध्ये, देवळाली मतदार संघ येथील सुद्धा नाशिकचे काही लोक आले आहेत. अजित पवार यांच्या सोबत गेलेले काही कार्यकर्ते आज परत येत आहेत नाशिक येथील देवळाली मतदारसंघ काहीही झाले तर जिंकायचा आहे. ही तुतारी आम्ही सुधाकर भालेराव आम्ही तुमच्या हातात देत आहोत. लातूर जिल्ह्यात मदत होईल पण राज्यात सुद्धा मातंग समाज सोबत आला पाहिजे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
विलासरावांची झाली आठवण
खासदार सुप्रिया सुळे यांनी विलासराव देशमुख यांची आठवण काढली. त्यांनी मुख्यमंत्री असताना आघाडीचा धर्म पाळल्याची आठवण त्यांनी काढली. लातूर हा महत्वाचा जिल्हा असल्याचे त्या म्हणाल्या. सुधाकर भालेराव यांनी मोठा निर्णय घेतला आहे. पक्ष त्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.