चिवट लढतीनंतर प्रणव घोलकर उपविजेता
पुणे – महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आणि ठाणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या सहकार्याने डोंबिवली येथे आयोजित केलेल्या पहिल्या
राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात शौरेन सोमण तर मुलींच्या गटात नैशा रेवसकर या दोन्ही पुण्याच्या खेळाडूंनी विजेतेपद पटकाविले. १७ वर्षाखालील गटात पुण्याच्या प्रणव घोलकर याला उपविजेतेपद मिळाले.

सावळाराम क्रीडा संकुलातील सुरेंद्र बाजपेयी स्मृती इनडोअर सभागृहात सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात सोमण याने ठाण्याचा खेळाडू प्रतिक कुलकर्णी याच्यावर ११-५,९-११,११-६,८-११,११-४ अशी मात केली. चुरशीने झालेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडविला. मात्र शेवटच्या गेममध्ये सुरुवातीपासूनच खेळावर नियंत्रण मिळवित सोमण याने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तो पुण्यातील सिम्बॉयसिस प्रशालेत नवव्या इयत्तेत शिकत आहे. मुलींच्या अंतिम फेरीत रेवसकर हिने नाशिकची खेळाडू स्वरा करमरकर हिचे आव्हान ९-११,११-९, ५-११,१२-१०,११-८ असे परतविले. तिने काउंटर अटॅक पद्धतीचा बहारदार खेळ केला. शौरेन व नैशा हे दोन्ही खेळाडू एम्स अकादमीत नीरज होनप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.
या स्पर्धेतील १३ वर्षाखालील मुलांच्या गटात टी एस टी मुंबई संघाच्या परम भिवंडकर याने विजेतेपद मिळवताना आपला सहकारी आरव व्होरा याला ११-८,१३-११,११-८ असे पराभूत केले. मुलींच्या अंतिम सामन्यात टी एस टी मुंबई संघाच्या मायरा सांगलीकर हिने अजिंक्यपद मिळविले. तिने अंतिम फेरीत ठाण्याच्या सैशा मधूर हिच्यावर ११-३, ११-८,११-५ असा विजय मिळविला.
मुलांच्या ११ वर्षाखालील गटात विजेतेपद मिळविताना नीरज नांदेदे (नांदेड) याने आर्य मूर्ती याचा १४-१२,११-६,११-९ असा पराभव केला. मुलींच्या अंतिम फेरीत ठाण्याच्या जिनया वधान हिने नाशिकची खेळाडू केशिका पूरकर हिला ११-१, ११-७,१२-१४,११-४ असे पराभूत केले
मुलींच्या १७ वर्षाखालील गटात काव्या भट्ट या ठाण्याच्या अव्वल मानांकित खेळाडूने अजिंक्यपदावर नाव कोरले. तिने अंतिम सामन्यात अनीषा पात्रा हिच्यावर ११-७, ११-७,११-९ असा विजय मिळविला. मुलांच्या गटात पुण्याच्या प्रणव घोलकर याने अग्रमानांकित खेळाडू ध्रुव शहा याला शेवटपर्यंत चिवट लढत दिली. मात्र ध्रुव याने हा सामना ११-४,२-११, ११-४,८-११,११-७ असा जिंकून आपले अव्वल मानांकन सार्थ ठरविले.