चौदा महिने मला जेलमध्ये काढावे लागले, माझ्यावर आरोप लावल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या माणसांना आपल्याकडे पाठवले आणि तुम्ही दोषी नाहीत हे आम्हाला माहीत आहे. आम्ही तुम्हाला मदत करतो, असे त्यांनी त्यांच्या माणसाच्या माध्यमातून मला सांगितले. काही कागदपत्र असलेले पाकीट मला पाठवले. त्या कागदांवर मी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर काय आरोप लावायचे हे सांगितले होते. हे आरोप केले तर तुम्हाला ईडी किंवा सीबीआयच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, असे त्यांनी सांगितले. परंतु, मी जेलमध्ये जाईल, मात्र, अशा प्रकारचे कृत्य आपण कधीही करणार नाही, असे मी त्यांना सांगितल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी जाहीर सभेत केला आहे.
जळगाव –शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ते सांगतील तशा पद्धतीने आरोप करा, असे मला देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आले होते, असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. ते जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी आपण तुरूंग स्विकारला पण साहेबांप्रती निष्ठा ठेवली, दुसरे म्हणजे या सर्व प्रकरणातून मी निर्दोष सुटलो. पण भाजपला घाबरलो नाही, असेही अनिल देशमुख यांनी आवर्जून सांगितले.
अनिल देशमुख म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकार सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत. आपल्यामधील जे काही लोक सोडून गेले ते ईडी आणि सीबीआयच्या धाकाने तिकडे गेले आहेत. माझ्यावर कोणतेही पुरावे नसताना खोटे आरोप आणि गुन्हे दाखल करण्यात आले होते. आपल्यावरील ईडी आणि सीबीआयची कारवाई टाळायची असेल तर तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर ते सांगतील तशा पद्धतीचे आरोप करण्याचे मला देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सांगण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील देशमुख यांनी केला.
पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका गाडीत बॉम्ब ठेवण्यात आले होते. गृहमंत्री म्हणून चौकशी करत असताना या बॉम्ब ठेवण्याच्या प्रक्रियेत मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि त्यांचे सहकारी सहभागी असल्याची माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आपण त्यांना बदली करून बाजूला केले होते. त्यांच्या बदलीनंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यास हाताशी धरून माझ्यावर शंभर कोटींचा आरोप करायला लावला. परंतु, शेवटी त्यात तथ्य दिसून न आल्याने आपण सुटलो.