स्वच्छंद पुणे आणि विनायक घोरपडे यांच्यातर्फे ‘विठू माऊली तू ‘ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे :विठ्ठला तू वेडा कुंभार… माझे माहेर पंढरी… बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल… धरीला पंढरीचा चोर….अशी विठ्ठलाचा आणि त्याच्या भक्तीचा महिमा सांगणारी भक्तिगीते मंत्रमुग्ध होऊन ऐकत सुरांच्या माध्यमातून कलाकारांसह श्रोत्यांनी आषाढी वारीचा अनुभूती घेत पंढरीच्या विठू माऊलीला चरणस्पर्श केला.
स्वच्छंद पुणे आणि विनायक घोरपडे यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढीवारी निमित्त ‘विठू माऊली तू’ या कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी प्रज्ञा गौरकर, भाविका कुलकर्णी, कैलास नारायण, विनायक घोरपडे आणि रवींद्र शाळू यांनी गायन केले. त्यांना तुषार दीक्षित (हार्मोनियम), अक्षय पाटणकर केदार तळणीकर (तबला), नरेंद्र काळे (तालवाद्य) यांनी साथ संगत केली. युनिटी स्मॉल फायनान्स बँके चे व्यवस्थापक अक्षय खापरे यांचे कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य व उपस्थिती लाभली.
प्रज्ञा गौरकर यांनी ‘मोगरा फुलला’ या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. भाविका कुलकर्णी यांनी गायलेल्या ‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल’ या गीताला श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील मर्मबंधातील ठेव विठ्ठल आहे आणि त्याला पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या अजरामर गायकीतून भक्तांसमोर आणले. विनायक घोरपडे यांनी भीमसेन जोशी यांनी गायलेली ‘आता कोठे धावे मन’ ही भक्ती रचना सादर करत वातावरण प्रसन्न केले. त्यानंतर गायक रवींद्र शाळू यांनी वसंत आजगावकर यांची ‘आली कुठून अशी कानी टाळ मृदुंगाची धुन नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमरोमांतुन’ ही रचना सादर करीत रसिकांची मने जिंकली.
संत ज्ञानेश्वर यांची रचना आणि लता मंगेशकर यांनी गायलेले ‘पैल तो गे काऊ कोकताहे’ ही गीत प्रज्ञा ने सादर करून श्रोत्यांची वन्स मोअर अशी दाद मिळवली. त्यानंतर सादर झालेली ‘देहाची तिजोरी’, ‘विठ्ठल गीतीं गावा, विठ्ठल चित्तीं ध्यावा’ ‘अबीर गुलाल’ रविंद्र शाळू यांनी सादर केलेल्या पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा ह्या संगीतकार राहुल घोरपडे यांच्या रचनेस व कानडा राजा पंढरीचा ह्या भक्ती रचनेस जोरदार वन्स मोअर देत विठ्ठल नामाचा गजर करत सभागृह विठ्ठलमय केले’, ‘धरिला पंढरीचा चोर’ ‘विठ्ठल नामाची शाळा भरली’ ‘चंद्रभागेच्या तीरी’ या भक्ती गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रम रंगत गेला. ‘माऊली माऊली’ ‘रखुमाई रखुमाई’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
ओंकार पाटणकर यांनी वाद्यवृंद संयोजन केले. सिद्धार्थ बेंद्रे यांनी निवेदन केले.