पुणे-,
पुण्यात एका महिला पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केले आहे. पोलीसांवर हात टाकेपर्यंत गुन्हेगार या राज्यात निर्ढावले आहेत. गृहमंत्री महोदय ही परिस्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे असे त्या म्हणाल्या आहेत.
सुप्रिया सुळे यांचे ट्विट नेमके काय?
सुप्रिया सुळे यांनी या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, ”राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच उरला नाही. पुण्यातील प्रचंड वर्दळीच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या जवळच एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. ड्रंक ॲंड ड्राईव्ह ची कारवाई सुरु असताना ही घटना घडली. हे कृत्य अतिशय संतापजनक आहे. थेट पोलीसांवर हात टाके पर्यंत गुन्हेगार या राज्यात निर्ढावले आहेत”, असा हल्ला त्यांनी चढवला.
तसेच, ”एकिकडे अशा घटनांमुळे पोलीस दलाच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होत असून दुसरीकडे सर्वसामान्य माणूस भीतीच्या सावटाखाली जगतोय ही सत्य परिस्थिती आहे. गृहमंत्री महोदय, पुण्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पोलीसांवरील हल्ला ही अतिशय गंभीर बाब आहे. याप्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण द्यावेत”, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
पुण्याच्या मध्यवर्ती भागात, दारूच्या नशेत एका ड्रायव्हरने दारू पिऊन गाडी चालवत असताना, एका महिला पोलिस अधिकारी आणि तिच्या सहकाऱ्यानी त्यास अडवले आणि विचारणा केली. यावेळी चालकाने थेट साह्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या महिला पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून देण्याचा धक्कादायक प्रयत्न केला.विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत फरासखाना वाहतूक कार्यलय समोर शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही गंभीर घटना घडली. संशयिताने लायटर उलटे धरल्याने ते पेटू शकले नाही आणि अनर्थ टळला.मद्यपान करून वाहन चालविण्याविरुद्ध पुणे शहरात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान ही घटना घडली. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वाहनांची तपासणी आणि गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नाकाबंदी करण्यात येत आहे. मात्र घटनेवरून मोठी खळबळ उडाली आहे.