पुणे-पुण्याच्या मध्यवर्ती भागात, दारूच्या नशेत एका ड्रायव्हरने दारू पिऊन गाडी चालवत असताना, एका महिला पोलिस अधिकारी आणि तिच्या सहकाऱ्यानी त्यास अडवले आणि विचारणा केली. यावेळी चालकाने थेट साह्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या महिला पोलिसांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून देण्याचा धक्कादायक प्रयत्न केला.
विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत फरासखाना वाहतूक कार्यालया समोर शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही गंभीर घटना घडली. संशयिताने लायटर उलटे धरल्याने ते पेटू शकले नाही आणि अनर्थ टळला.मद्यपान करून वाहन चालविण्याविरुद्ध पुणे शहरात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान ही घटना घडली. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वाहनांची तपासणी आणि गुन्हेगारांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नाकाबंदी करण्यात येत आहे. विश्रामबागमध्ये अशाच एका कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी एका मद्यधुंद चालकाला तपासणीसाठी रस्त्यावर थांबवले. यावेळी संबधित चालक आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. रागाच्या भरात चालकाने अधिकाऱ्यांवर पेट्रोल टाकले आणि लायटरने त्यांना पेटवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने लायटर चुकीच्या पध्दतीने धरल्याने तो पेटला गेला नाही, त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला. पोलिसांनी त्वरीत चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस पुढील तपास करत आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई रात्रीच्या वेळेस पोलिसांकडून कडक करण्यात आल्याने ठिकठिकाणी रात्रीच्या वेळेस पोलिसांचा बंदोबस्त सध्या दिसून येत आहे.