पुणे- देशासाठी बलिदान दिलेल्या गांधी घराण्यातील राहुल गांधी यांच्याबाबत ज्यांचा इतिहास हिंसाचाराचा आहे ते भाजपचे सध्याचे शहर अध्यक्ष धीरज घाटे बेकायदा फलक लावून खोटे नाटे आरोप करत पुण्यातील वातावरण दुषित करत असून तातडीने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांना लेखी निवेदन देऊन केली आहे .
या निवेदनात अरविंद शिंदे यांनी असे म्हटले आहे कि,’ पुणे शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने पुणे शहर भाजपाचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्या विरूध्द या पत्राद्वारे आम्ही कायदेशिर कारवाई करण्याची लेखी मागणी आपणाकडे करीत आहे. श्री. धीरज घाटे यांनी काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुलजी गांधी यांच्या बाबत गेले २ दिवस वादग्रस्त वक्तव्ये केलेली आहेत. राहुल गांधी हे अपरिपक्व नेते असून मुस्लिमांचे लांगुन पालन करत आहेत. हा देश हिंदूचा असून देशातील हिंदू हे राहुल गांधी यांना रस्त्यावर फिरून देणार नाहीत, अशी वक्तव्ये त्यांनी इलेक्ट्रॉनिक मिडिया समोर केलेली आहेत. लोकसभेतील मा. राहुल गांधींच्या भाषणाचा विपर्यास करून काँग्रेस पक्षाची बदनामी होईल अशी वक्तव्ये त्यांनी केलेली आहेत. लोकसभेच्या भाषणात मा. राहुलजी गांधी यांनी कुठेही हिंदूना हिंसक म्हटलेले नसताना जाणीवपूर्वक हिंदू विरोधी असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच शहरात जागोजागी बेकायदेशिररित्या वादग्रस्त मजकूर असलेले बेकायदेशिर फलक उभे केले आहेत. जातीय दंगली भडकवून त्याचा राजकीय फायदा व्हावा या दुष्ट हेतूने अन्य धर्मियाच्या भावना दुखावणारी बोचरी वक्तव्ये त्यांनी ओदांलनादरम्यान केलेली आहेत. पुणे शहर हे देशाची सांस्कृतिक राजधनीचे शहर असून शहरातील राजकीय, सामाजिक सलोखा यांचे कौतुक देश पातळीवर होत असते. शहरातील सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडविण्यासाठी काँग्रेस भवन येथे राजकीय स्टंट करण्याचा प्रयत्न बुधवार दि. ३/६/२०२४ रोजी धीरज घाटे यांनी केला. धीरज घाटे भाजपाचे शहराध्यक्ष झाल्यापासून शहरातील सामाजिक सलोखा हा धोक्यात आला आहे. धीरज घाटे हे स्वतःला योगी आदित्यनाथांचे अवतार समजत असून त्यांचे सामाजिक व राजकीय आचरण हे मनोरूग्णासारखे आहे. धीरज घाटे यांचा राजकीय इतिहास हा हिंसाचाराचा असून राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर दगडफेक करणे, कार्यकर्त्यांना धमकाविणे, अल्पसंख्यांकावर भीतीचे वातावरण निर्माण करणे यामध्ये धीरज घाटे कायम अग्रेसर असतात. धीरज घाटे यांच्यावर दाखल गुन्ह्याचा आलेख बघता अनेक समाजद्रोही बाबींसाठी घाटेंवर गुन्हे दाखल झाले असल्याचे आपल्या निदर्शनास येईल. धीरज घाटे याच्या विकृत वागण्याने आगामी गणेशोत्सवात व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निश्चितच जातीय तणाव निर्माण होऊ शकतो.काँग्रेस पक्षाची बदनामी करणे, विरोधी पक्षनेते मा. राहुल गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरणे, जातीय तेढ निर्माण होण्याकरीता आक्षेपार्ह मजकूर टाकून विना परवानगी बेकायदेशिर जाहिरात फलक उभे करणे या बाबत धीरज घाटे यांच्या विरूध्द कायदेशिर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा. धीरज घाटे यांना राजकीय वशिल्याने मिळालेले पोलीस संरक्षणाचा ते गैरफायदा घेत असून सर्वसामान्यांमध्ये दबावाचे, भीतीचे वातावरण निर्मिती करण्यासाठी घेतला जात आहे. यामुळे धीरज घाटे यांना दिलेले पोलीस संरक्षण काढून घेण्यात यावे. या बाबत आपणाकडून कोणतेही ठोस कारवाई न झाल्यास नाईलाजास्तव योग्य न्यायिक संस्थेकडे दाद मागण्यात येईल.