पुणे: छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ३५० पूर्ण झाले असून त्यांच्या महान कार्याला मानवंदना देण्यासाठी तसेच इतिहासाची साक्ष देणाऱ्या सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा (SRTL) किल्ल्यांचे दर्शन घडवण्यासाठी या परिसरात एसआरटीएल अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा येत्या शनिवारी ९ डिसेंबर रोजी रंगणार आहे. यंदाचे स्पर्धेचे हे सहावे वर्ष आहे. सिंहगडाच्या पायथ्यापासून ते तोरणा किल्ल्यापर्यंत ते लिंगाणा सुळक्याच्या पायथ्यापर्यंत या मॅरेथॉनचा मार्ग असणार आहे. नॉर्वे, आइसलँड, फ्रांस, स्पेन, साऊथ आफ्रिका, कॅनडा, नेपाळ या ७ देशातील खेळाडूंसह, भारतातील २४ राज्य आणि ५५ शहरातील एकूण ९०० हुन अधिक स्पर्धक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही मॅरेथॉन १०० किमी, ५३ किमी, २५ किमी व ११ किमी अशा वेगवेगळ्या विभागात घेतली जात आहे. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. शर्यतीत सहभागी होण्याऱ्या स्पर्धकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात असून त्याचबरोबर प्रथामिक सोय सुविधांची व्यवस्था केली गेली आहे. विजयी स्पर्धकांना विशेष सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. पश्चिम घाटातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या परिसरात ही १०० किमीची मॅरेथॉन स्पर्धा स्पर्धकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरणारी आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दिग्विजय जेधे यांनी दिली.
एसआरटीएल अल्ट्रा मॅरेथॉन ही सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा किल्ल्यांना जोडणारी प्राचीन मार्गाची एक रोमांचकारी मॅरेथॉन आहे. स्पर्धेत गोळेवाडी (डोणजे) ते सिंहगड ११ किमी, डोणजे-सिंहगड ते राजगड २५ किमी, डोणजे-तोरणा ५३ किमी आणि डोणजे ते लिंगाणा १०० किमी अशा चार अंतर श्रेणीमध्ये ही स्पर्धा आहे. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशन हे इंटरनॅशनल ट्रेल रनिंग असोसियेशनची सदस्य आहे. एसआरटीएल ही स्पर्धा वेळेत पुर्ण करणारया स्पर्धकांना फ्रांस मधील UTMB पात्रतेसाठी अवश्यक गूण मिळतात.
छत्रपती शिवरायांच्या व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंहगड, राजगड, तोरणा आणि लिंगाणा गडकिल्ल्यांच्या सानिध्यातील ही स्पर्धा पुर्वीच्या काळी प्रवास,व्यापार शेतीसाठी वापरलेला हा मार्ग ऐतिहासिक पाऊलखुणांची आठवण करून देणारा आहे. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून थोडासा वेळ काढून स्वतःच्या आरोग्यासाठी व आनंदासाठी वेळ काढणे महत्त्वाचे झाले आहे. एसआरटीएल मॅरेथॉन सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आरोग्य अशा तिन्ही बाबींचा समन्वय साधणारी स्पर्धा आहे. महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग तसेच वन विभाग, पर्यटन विभाग, पुणे पोलीस व पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या विशेष सहकार्याने हि स्पर्धा दरवर्षी यशस्वी पार पडते.
एसआरटीएल अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन अध्यक्ष दिग्विजय जेधे, विश्वस्त अनिल पवार, महेश मालुसरे, मंदार मते, मारूती गोळे, अमर धुमाळ, ऍड. राजेश सातपुते, हर्षद राव व टीम फाउंडेशनच्या ५०० स्वयंसेवकांनी यासाठी अथक परिश्रम केले आहे. यावर्षी दार्जिलींग चा हेमंत लिंबू व सोमबहाद्दूर आणि महाराष्ट्रातील देव चौधरी या अव्वल धावपट्टूनी एसआरटीएल १०० किमी १० तासात पूर्ण करण्याचे आवाहन स्वीकारले आहे हि चर्चेची बाब बनली. या स्पर्धेसाठी पहिल्यांदाच ऍथलेट ट्रेनिंग प्रोग्रॅम घेण्यात आला याचे नैतृत्व कोच योगेश सानप यांनी केले व त्यांना आहारतज्ज्ञ डॉ. स्वाती चंद्रशेखर व कोच शामल मोंडल यांनी सहकार्य केले.