पुणे : ज्या हॉटेल, पबमध्ये ड्रग्जची देवघेव होते ते हॉटेल, पब कायमस्वरूपी सील केले पाहिजे. शहरातील आता हॉटेल, पब चालकांना भीती राहिलेली नाही. अजूनही पहाटे चार वाजेपर्यंत बार चालू चालतात. ही कीड संपलेली नाही. निव्वळ पैसे, हप्ता यांच्या नादात पुण्याचे नाव बरबाद करण्याचे काम काही मंडळी करत आहेत. आम्ही रस्त्यावर उतरुन या विरोधात आंदोलन तर करूच शिवाय पावसाळी अधिवेशनात आवाज ही उठवणार आहोत, अशी भूमिका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांडली.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर एका मोठ्या हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यातच शनिवारी मध्यरात्री अल्पवयीन मुले सर्रासपणे ड्रग्ज घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. या पार्श्वभूमीवर, कारवाई करत पुणे पोलिसांनी दोन जणांना तब्यात घेतले आहे.
या प्रकारानंतर आमदार रवींद्र धंगेकर बोलत होते. ते म्हणाले, “या प्रकरणामध्ये पूर्णपणे पोलिसांची चूक आहे. शहरात अंमली पदार्थ सर्रासपणे मिळत आहे. हुक्का पार्लरच्या नावाखाली पुणे शहरात प्रचंड प्रमाणात अंमली पदार्थ मिळतात. यामध्येही पोलिसांची चूकच आहे. अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. आर्थिक देवघेवीमुळे असे धंदे चालतात. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे अधिकाऱ्याला पाठिशी घालतात म्हणून हे धंदे चालतात.
आम्ही अनेक आंदोलने करुनही संबंधित अधिकाऱ्याची बदलीसुद्धा होत नाही. याचा अर्थ असा आहे की, हे खोके सरकार या माध्यमातून जमा झालेला पैसा राजकारणात वापरतात. पण, तरुणाईचे आयुष्य बरबाद होत आहे. नवी पिढी व्यसनांच्या आहारी जावून बरबाद होत आहे. त्यामुळे सरकार असेल किंवा मंत्री, यांनी संवेदनशिलतेने या विषयाकडे पाहिले पाहिजे पुणे हे विद्येचं माहेर आहे. याला काळीमा फासण्याचं काम पोलिसांच्या वतीने होत आहे. हे ताबडतोब थांबले पाहिजे, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.