केंद्रीयमंत्री मोहोळ यांच्या निर्देशा नंतर पोलिसांची झटपट कारवाई
पुणे:
पुण्यातील एफसी रोडवर असलेल्या लिक्विड लीजर लाउंज बारमध्ये ड्रग्ज पार्टी सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत दोन जणांना अटक केली आहे. माध्यमातून आलेल्या बातमीनंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि लीजर लाउंज बार सील केला.शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील बीट मार्शल यांना निलंबित करण्यात आले आहे.पोलीस उपायुक्त संदीप गील यांनी सांगितले की, “एफसी रोडवरील लिक्विड लीजर लाउंज बार लिमिटपेक्षा जास्त वेळ चालला असल्याची माहिती सोशल मीडियावरून मिळाली. बार मालक संतोष कामठे आणि सचिन कामठे यांनी हा बार करार करून तीन लोकांना रेंटवर दिला होता.”
काल रात्री एफसी रोडवरील लीजर लाउंज बार नावाचा बार रात्री १.३० नंतरही सुरु होता. बारचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून दुसऱ्या गेटने पार्टी करणाऱ्यांना आत प्रवेश दिला गेला होता. एका इव्हेंट मॅनेजरने ४० ते ५० लोकांना पार्टी करण्याची परवानगी हॉटेल मालकांकडून घेतली होती.पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे आणि बार सील केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पदार्थांची तपासणी अमली पदार्थ विरोधी पथक करत आहे. या प्रकरणात १८८ कलम आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीप गील यांनी दिली.