पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२६- टीओडी वीजमीटर बसविणाऱ्या वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळातील दिवसा वीजवापरावर ८० पैसे प्रतियुनिट सवलत दिली जाते. या सवलतीपोटी जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ ह्या कालावधीत पुणेकरांना ८ कोटी ६० लाखांचा फायदा झाला असून, त्यांच्या दरमहाच्या वीजबिलात ही सवलत जमा झाली आहे. स्मार्ट/टीओडी वीजमीटर मोफत बसविले जात असून, ग्राहकांनी मीटर बसविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे.
महावितरण पुणे परिमंडलात वीजग्राहकांची संख्या ३९ लाख ७१ हजार इतकी असून, त्यापैकी ९ लाख ८४ हजार ग्राहकांना अत्याधुनिक टीओडी वीजमीटर बसविण्यात आले आहे. तर उर्वरित ग्राहकांना हे अत्याधुनिक मीटर लवकरच बसविले जात आहे. वीजमीटर बसविण्याची सुरुवात महावितरणने स्वत:पासून केली. महावितरणच्या सर्व आस्थापना व कर्मचारी वसाहतींना हे मीटर लावण्यात आले आहे. त्यापाठोपाठ सर्व सरकारी कार्यालये, शासकीय वसाहती आदींनाही हे मीटर बसविले आहे. हे मीटर पूर्णत: मोफत असून, त्यासाठी महावितरणकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
सवलत का दिली जाते ?
महावितरणला लागणाऱ्या विजेत दिवसेंदिवस सौरऊर्जेचा वाटा वाढत आहे. ही वीज दिवसा मिळत असून, इतर विजेच्या तुलनेत स्वस्त आहे. ह्या स्वस्त् विजेचा फायदा महावितरण ग्राहकांना आकारल्या जाणाऱ्या वीज दरावर प्रतियुनिट ८० पैसे प्रमाणे देते. पुढील काळात ही सवलत १ रुपया प्रति युनिटपर्यंत जाणार आहे. ह्या सवलतीसाठी ग्राहकाकडे टीओडी मीटर असणे क्रमप्राप्त आहे.
कोणत्या मंडलामध्ये जास्त फायदा ?
पुणे परिमंडलात गणेशखिंड शहर मंडल, रास्तापेठ शहर मंडल व पुणे ग्रामीण मंडल अशी तीन प्रमुख कार्यालये आहेत. त्यापैकी गणेशखिंड शहर मंडलात ३ लाख ६६ हजार ८६७ टीओडी मीटर आहेत. रास्तापेठ शहर मंडल दुसऱ्या क्रमांकावर असून या मंडलात ३ लाख ६३ हजार ७४२ टीओडी मीटर ग्राहक आहेत. तर पुणे ग्रामीण मंडलामध्ये २ लाख ५४ हजार ३५३ टीओडी मीटर/ग्राहक आहेत. या मंडलांतील टीओडी मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना सात महिन्यांमध्ये अनुक्रमे गणेशखिंड- ३ कोटी ६९ लाख ३४ हजार २ रुपये, रास्तापेठ- ३ कोटी ५३ लाख ६२ हजार ६५९ रुपये तर पुणे ग्रामीण- १ कोटी ३७ लाख ७५ हजार ५६० रुपये सवलत मिळाली आहे.
वीजबिल जास्त येत नाही- काकडे
काही ठिकाणी नविन मीटरचे फायदे समजून न घेता ते बसविण्यापूर्वीच अनाठायी विरोध केला जात आहे. विजेचे बिल जास्त येत नाही तर ते अचूक असेल. ग्राहकांनी ऐकीव किंवा सोशल मिडीयावर आलेल्या अफवांना बळी पडू नये. मीटर बसविण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.
सुनील काकडे,मुख्य अभियंता, महावितरण पुणे परिमंडल
| मंडल | एकूण ग्राहक | टीओडी ग्राहक | सवलत (रुपये) |
| गणेशखिंड शहर मंडल | १४७२२२३ | ३६६८६७ | ३,६९,३४,०७२ |
| रास्तापेठ शहर मंडल | १५०३२२५ | ३६३७४२ | ३,५३,६२,६५९ |
| पुणे ग्रामीण मंडल | ९९६४१५ | २५४३५३ | १,३७,७५,५६० |
| पुणे परिमंडल एकूण | ३९७१८६३ | ९८४९६२ | ८,६०,७२,२९१ |

