पुणे- पुण्यातील अमली पदार्थ सेवन करतानाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आपल्या सूचनेनंतर मोठी कारवाई करण्यात आली असून ज्या हद्दीतील हा प्रकार आहे, त्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरिक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे.काल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधून याबाबत तातडीने कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले होते, त्यानंतर लगेचच पोलिसांनी fc रस्त्यावरील संबधित हॉटेलवर छापा मारून प्रथम दोघांना अटक करत बीट मार्शलना निलंबित केले होते . आज शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरिक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे.
मोहोळ म्हणाले, ” निलंबनाची कारवाई ही तत्काळची असली तरी पूर्ण पुणे शहरात अमली पदार्थ विरोधात पुणे पोलीसांची स्वतंत्र मोहिम आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची सूचनाही आयुक्तांना केली आहे.सर्व महाविद्यालये, पब्स, हॅाटेल्स, संशयास्पद ठिकाणं येथे त्वरीत ही शोधमोहिम कडक कारवाईसह करण्यात यावी आणि अंमली पदार्थ पुणे शहरात उपलब्ध होतात कसे? याच्या मुळाशी पोहचण्यासाठी प्रभावी तपास मोहिम सुरू करण्यात यावी, अशाही सूचना दिल्या आहेत.
दरम्यान पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये एकूण आठ जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारमालकांसह मॅनेजर डीजेवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी आठही जणांना पुणे पोलीस करणार कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणानंतर पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला. याचदरम्यान पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात असल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे. पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात- नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 मध्ये 155 गुन्हे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह बाकी पोलिस ठाण्यांमध्ये एनडीपीएस अॅक्टअंतर्गत 1 नोव्हेंबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 155 गुन्हे दाखल झाले आहेत. यात 215 आरोपींना अटक करण्यात आली आहे.