पुणे-1975 साली आणीबाणी लागू झाल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांची धरपकड सुरू झाली. त्यावेळेला त्याची बातमी सुद्धा छापून येत नव्हती कारण आणीबाणी मध्येच सेंसरशिप लावली होती. प्रत्येक वर्तमानपत्रांमध्ये एक पोलिस अधिकारी येऊन सगळ्या बातम्या तपासायचे आणि जे ते म्हणतील तेवढ्याच बातम्या देता यायच्या. त्यामुळे सत्य बाहेर आलेच नाही. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते जागरूक होते आणि त्यांनी या काळ्या आणीबाणी विरुद्ध जोरदार लढा देण्याचा निर्णय केला. त्या निर्णयानुसार लगेच सत्याग्रहाची आखणी सुरू झाली आणि पुढे वर्षभर हे सत्याग्रह सर्व ठिकाणी होतच राहिले.अशा सर्व सत्याग्रहींनी एकत्र येऊन निष्पाप संविधान संरक्षणाच्या लढ्याची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी ‘लोकतंत्र सेनानी संघ’’ आणि मासिक बैठक यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.
लोकतंत्र सेनानी संघ’’ आणि मासिक बैठक समितीच्या वतीने आणीबाणीचा लढा या विषयावर जावडेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.प्रा. अनिरुद्ध देशपांडे, जयंत म्हाळगी, यशवंत कुलकर्णी, बाळासाहेब पाटोळे, अनुपमा लिमये, सूर्यकांत पाठक यांची उपस्थिती होती.
जावडेकर म्हणाले, आणीबाणीच्या कालखंडात लोकशाहीच्या मूलभूत स्वातंत्र्यावर घाला आला. विचार, आचार, अभिव्यक्ती, संघटन, आंदोलन असे सर्व अधिकार घटनादुरुस्ती करून काढून घेण्यात आले. जेलमध्ये असताना सर्व बंद्यांनी अनेक अनेक उपक्रम करत मनोधैर्य मोठं ठेवलं. त्याच्याही पेक्षा एक मोठा प्रचार बाहेरच्या जगातही चालू ठेवला. भूमिगत चळवळीतून एक नवी जागृतीची लाट आली. 19 महिन्यानंतर निवडणुका घोषित केल्या आणि त्या निवडणुका सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन केलेल्या जनता पक्षाने जिंकल्या.
हा 50 दिवसाच्या लढ्याचा इतिहासही फार महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा इंदिराजींनी निवडणुकांची घोषणा केली तेव्हा अनेक नेत्यांना असं वाटत होतं की हा एक ट्रॅप आहे आणि ट्रॅप मध्ये आपला पराभव होईल आणि इंदिराजी सांगतील की जनतेने माझ्या आणीबाणीच्या शासनावर शिक्कामोर्तब केलाय.
पण अनेक नेत्यांनी हा विचार केला की, 50 दिवसांची ही संधी वाया घालवता कामा नये आणि त्यामुळे 50 दिवसात ऐतिहासिक प्रचार झाला. जनतेने पैसे, समर्थन आणि मतदान तिन्ही दिलं आणि त्याचा परिणाम म्हणून जनता पक्षाच्या 295 सीट्स निवडून आल्या.जावडेकर पुढे म्हणाले, काँग्रेसने नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए सरकार घटना बदलून, आरक्षण समाप्त करणार असा अपप्रचार केला. पण प्रत्यक्षात काँग्रेसने बाबासाहेबांची घटना मोडकळीत कशी आणली याची 1975 ची ही कहाणी आहे.
काँग्रेसने या निवडणुकीत खोटारडे राजकारण केलं. ते टिकू शकलं नाही. पुन्हा मोदी सत्तेवर आले. पुन्हा एनडीएच सरकार आलं. हा जनतेचा कौल आहे. आणीबाणी लावणारी काँग्रेस आज भाजप सरकार विरुद्ध घटना बदलण्याची अफवा उठवतात, हे म्हणजेच चोराच्या उलट्या बोंबा आहेत.

