पुणे दिनांक २१ जून—एकम टेबल टेनिस अकादमीतर्फे आयोजित केलेल्या यंदाच्या तिसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील मुलांच्या १९ वर्षाखालील गटात अव्वल मानांकित नील मुळ्ये याला विजेतेपदासाठी पारंपरिक प्रतिस्पर्धी प्रणव घोलकर यांच्याशी खेळावे लागणार आहे. मुलींमध्ये नैशा रेवसकर व जान्हवी फणसे यांच्यात अंतिम लढत होईल.
ग्रॅव्हिटी क्रीडा संकुल, डांगी चौक (पिंपरी चिंचवड परिसर) येथे ही स्पर्धा पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली आहे. मुलांच्या १९ वर्षाखालील गटात इंडियन ऑईल संघाचा अग्रमानांकित नील याने चौथ्या मानांकित संस्कार बसाक याला पराभूत केले. मात्र त्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला हा सामना त्याने ११-७,११-८, १२-१४, ११-८ असा जिंकताना अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडविला. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत तृतीय मानांकित प्रणव याने द्वितीय मानांकित अमिष आठवले याच्यावर सरळ तीन गेम्स मध्ये मात करताना चतुरस्त्र खेळ केला. हा सामना त्याने ११-९,११-९,११-७ असा जिंकला.
या मोसमात अनेक विजेतेपदे मिळवणाऱ्या नैशा हिने या स्पर्धेतही आणखी एका अजिंक्यपदाच्या दिशेने वाटचाल केली. तिने १९ वर्षाखालील उपांत्य लढतीत तृतीय मानांकित रुचिता दारवटकर हिला पराभूत केले. हा सामना ११-७,९-११, ११-९, ८-११,११-४ असा जिंकताना तिला खूपच कष्ट घ्यावे लागले. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत जान्हवी या चौथ्या मानांकित खेळाडूने अग्रमानांकित खेळाडू तनया अभ्यंकर हिच्यावर ४-११,११-८,११-७, ११-९ असा आश्चर्यजनक विजय मिळविला.