राज मेमाणे लिखित ‘मराठ्यांचे आरमार द धुळप एरा’ या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे ः गावाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक गावाच्या वेशीवर श्री मारुती आणि काळभैरव असतात. तसेच प्रदिर्घ काळ आपल्याकडील समुद्र सीमांचे रक्षण धुळप आणि आंग्रे यांनी केले आहे. हे त्या काळात आपले दैवतच होते. आज २०० वर्षांनंतर धुळप घरण्याचे कागद काढून त्यावर राज मेमाणे यांनी अभ्यास केला आहे. आरमाराच्या गोष्टी इतिहासाच्या पुस्तकात आल्या पाहिजेत. धुळप घराण्याच्या कामगिरीबद्दल शालेय पुस्तकात देखील माहिती समाविष्ट केली पाहिजे, असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक मंदार लवाटे यांनी व्यक्त केले.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ३५१ व्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून की मल्हार पब्लिकेशन पुणे या प्रकाशन संस्थेच्या वतीने इतिहास संशोधक राज मेमाणे लिखित ‘मराठ्यांचे आरमार द धुळप एरा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आपटे रोड येेथील ऑर्चर्ड हाॅटेल येथे पुस्तक प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा, धुळप घराण्याचे वंशज अमित धुळप, लेखक राज मेमाणे आदी उपस्थित होते. पुणे पुरालेखागार यातील हजारो अप्रकाशित मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून सदर पुस्तक लिहिले आहे.
पुष्कर पेशवा म्हणाले, लेखक राज मेमाणे यांचे देवगिरी हे पुस्तक वाचल्यानंतर मी जेव्हा देवगिरीला गेलो त्यानंतर एकदाही मी त्या किल्ल्याचा उल्लेख दौलताबाद असा केला नाही, हे त्यांच्या देवगिरी पुस्तकाचे श्रेय आहे. त्याचप्रमाणे आंग्रे आणि धुळप यांच्या विषयी खूप माहिती या पुस्तकातून कळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
अमित धुळप म्हणाले, धुळपांच्या घराण्याचे योगदान पुढे येणे गरजेचे होते ते या पुस्तकाच्या माध्यमातून होत आहे.
राज मेमाणे म्हणाले, इसवी सन १७५६ साली पेशवे विरुद्ध तुळाजी आंग्रे यांच्यात संघर्ष होऊन मराठा आरमाराचा ताबा पेशव्यांकडे आला. पुढील काळात पेशाव्यांनी आंग्रे यांचेच सरदार आणि जावळीच्या चंद्रराव मोरे यांचे वंशज असलेल्या रुद्राजीराव धुळप यांच्याकडे आरमाराची सुभेदारी दिली. धुळप घराण्यातील सुभेदार रुद्राजीराव धुळप, आनंदराव धुळप, जानराव धुळप, भगवंतराव धुळप इत्यादी अनेक दर्या धुरंधरांनी आपल्या अद्वितीय पराक्रमाने आंग्रे घराण्यानंतर मराठा आरमाराचा समुद्रावरील दबदबा पूर्वीप्रमाणेच सुमारे ५ ते ६ दशके कायम ठेवला. आणि डच, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच इत्यादी शत्रूंवर जरब बसविली. समुद्रावर दुसऱ्या आंग्रेंचा उदय झाला आहे असे पोर्तुगीजांनी म्हटले आहे, असा ही उल्लेख आढळतो.
ते पुढे म्हणाले, या पुस्तकातून पेशव्यांनी मराठा आरमार बुडविले हा अपसमज दूर होईल आणि धुळप घराण्याने मराठा आरमारासाठी जे अतुलनीय योगदान दिले आहे त्यावरही प्रकाश पडेल. पुढील काळात मराठा आरमार म्हटल्यावर आंग्रे यांच्यानंतर धुळप घराण्याचे नाव घेतले जाईल. यात कोणतीही शंका नाही, असेही त्यांनी सांगितले. मानसी आमडेकर यांनी सूत्रसंचालन केले.