गत काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे. पोर्शे कार अपघातानंतर पुण्यात अवघ्या 25 दिवसांत 70 अपघात झालेत. त्यात 31 जणांचा बळी गेला असून, 54 जण जखमी झालेत. पोलिस या वाढत्या अपघातांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करत आहेत. कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघातानंतर 920 ड्रंक अँड ड्राइव्हच्या केसेस दाखल झाल्यात. पुणे शहरात अपघाताचे 22 ब्लॅक स्पॉट आहेत.
पुणे-अल्पवयीन कार चालकाने किरकोळ वादातून एका महिलेसह नागरिकांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार आळंदीत घडला आहे. पुण्यातील पोर्शे कारच्या अपघाताची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.पुण्यातील कल्याणीनगर भागात गत महिन्यात हिट अँड रनचा प्रकार घडला होता. त्यात एका बिल्डरच्या मद्यधुंद अल्पवयीन मुलाने 2 तरुण अभियंत्यांना उडवले होते. त्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेच्या बातमीची शाई वाळते न वाळते तोच आळंदी परिसरातही अशीच एक घटना घडली आहे. या घटनेतही एक अल्पवयीन कार चालक आपल्या गाडीखाली महिला व काही नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. जुन्या वादातून ही घटना घडल्याचा दावा केला जात आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आळंदीलगतच्या वडगाव घेणंद येथे हा प्रकार घडला. अल्पवयीन कार चालकाचा येथील काही नागरिकांशी जूना वाद होता. या वादातून त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. वाद टोकाला गेल्यानंतर अल्पवयीन आरोपीने आपली कार काही अंतरापर्यंत मागे घेतली. त्यानंतर भरधाव वेगात ती पुढे आणत वाद घालणाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. यावेळी एक महिला त्याच्या कारपुढे येऊन कार अडवण्याचा प्रयत्न करते. पण तो तिला धडक मारत पुढे निघून जातो, असे व्हिडिओत दिसून येत आहे.
या घटनेचा धडकी बसवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सुदैवाने या प्रकरणात कोणतीही जीवितहाणी झाली नाही. पण आरोपी तरुणाच्या या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आरोपीने कारच्या छतावर बसून उपस्थितांना शिवीगाळ केल्याचाही दावा केला जात आहे. पण त्याची पुष्टी झाली नाही. यासंबंधी नाजुका यांच्या फिर्यादीवरून आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी वेगवान कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आळल्या. पोलिस या प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या पालकांवरही कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.